कोल्हापुरातील आयटी पार्क विकसित करण्यासाठी मंत्रिमंडळात प्रस्ताव मंजूर

कोल्हापुरातील आयटी पार्क विकसित करण्यासाठी  मंत्रिमंडळात प्रस्ताव मंजूर

मुंबई (प्रतिनिधी): शेंडा पार्कमधील 34 हेक्टर 36 गुंठे जमीन आयटी पार्क विकसित करण्यासाठी देण्याच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळाली. यासाठी मंत्री हसन मुश्रीफ व आमदार अमल महाडिक यांनी  विशेष प्रयत्न केले. दिवंगत लोकनेते कै. अजित दादा पवार यांनीही आय.टी. पार्कच्या पूर्ततेसाठी घेतल्या होत्या दोन बैठका.

         याबाबत बोलताना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, या प्रस्तावाच्या मंत्रिमंडळ मंजुरीमुळे ही जागा आता उद्योग विभागाला दिली जाणार आहे. या विभागामार्फत मोठ- मोठे प्रकल्प आणले जातील. या आयटी पार्कमध्ये मोठ मोठ्या कंपन्या येण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार वहिनी, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून प्रयत्न करू. कोल्हापूर जिल्ह्यासह परिसरातील लाखो आय. टी. क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ पुणे, बेंगलोर, मुंबई, हैदराबादसह, अमेरिकेमध्ये कार्यरत आहे. या आयटी पार्कमुळे आय. टी. क्षेत्रातील भूमिपुत्र तरुण-तरुणींना स्थानिक ठिकाणी म्हणजे कोल्हापूरमध्येच रोजगार उपलब्ध होईल. आत्ता कोल्हापूर विमानतळ आणि कोल्हापूर रेल्वे स्टेशनही सर्व सोयी आणि सेवा-सुविधांनी युक्त आहे. आयटी पार्कसाठी आवश्यक त्या सर्व पायाभूत सोयीसुविधा आता कोल्हापुरातच निर्माण झालेल्या आहेत.

         याबाबत अधिक माहिती अशी, कोल्हापूर शहरातील शेंडा पार्क परिसरातील गट नंबर 583, 587 व 588 मधील एकूण 36 हेक्टर 36 गुंठे जमीन प्रथमता महसूल विभागाकडे समर्पित करण्यास मान्यता देण्यात यावी, असा प्रस्ताव आहे. त्यानंतर महसूल विभागाकडे समर्पित केलेल्या 36 हेक्टर, 36 गुंठे जमिनीपैकी 34 हेक्टर 36 गुंठे जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे आयटी पार्क विकसित करण्यासाठी हस्तांतरित करावी. या जमिनीची कृषिक दराने प्रचलित बाजार मूल्यानुसार परीगणित केलेली संपूर्ण रक्कम वसूल करून भोगवटादार वर्ग- दोन या धारणाधिकाराने कब्जे हक्काने प्रदान करण्याचा निर्णय जाणीवपूर्वक घेण्यात यावा, अशी मागणी प्रस्तावात नमूद केली आहे.

     शेंडा पार्कातील ही जागा मुंबई- बेंगलोर राष्ट्रीय महामार्गापासून जवळ असून आजूबाजूला मोठी नागरी वस्ती आणि शैक्षणिक संस्था विकसित होत आहेत. जवळच शिवाजी विद्यापीठ आणि अन्य नामांकित संस्थाही असल्यामुळे कुशल मनुष्यबळही सहज उपलब्ध होणार आहे. या जागे लगतच २५ एकर जागेवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि २५ एकर जागेवर उच्च न्यायालयाचे कोल्हापूर खंडपीठ प्रस्तावित असून नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम सुरू आहे.