कोल्हापुरात मुसळधार पावसामुळे कोसळण्याच्या स्थितीत असलेला 'तो' कटआऊट महापालिकेने हटवला

कोल्हापुरात मुसळधार पावसामुळे कोसळण्याच्या स्थितीत असलेला 'तो' कटआऊट महापालिकेने हटवला

कोल्हापूर/ प्रतिनिधी  : कोल्हापुरात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. याच पावसामुळे आज ऐतिहासिक दसरा चौकात एक मोठी दुर्घटना घडता घडता राहिली. चौकात उभारण्यात आलेला एक भलामोठा कटआऊट अचानक एका बाजूला झुकला आणि थेट कोसळण्याच्या स्थितीत आला.

सुदैवाने, कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वीच कोल्हापूर महापालिका प्रशासनाने प्रसंगावधान राखलं. महापालिकेच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत, तो धोकादायक कटआऊट सुरक्षितपणे खाली उतरवला. यामुळे मोठा अनर्थ टळला असून नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.


सध्या शहरात सुरू असलेल्या वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे आणि फांद्या कोसळण्याच्या घटना घडत आहेत. अशा परिस्थितीत रस्त्यावरील मोठे होर्डिंग्ज, कटआऊट आणि जाहिरात फलक नागरिकांच्या जीवावर बेतू शकतात. त्यामुळे शहरातील अशा सर्वच धोकादायक फलकांची तपासणी करून ते तातडीने हटवावेत, अशी मागणी आता कोल्हापूरकरांमधून जोर धरत आहे. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी महापालिकेने आता आणखी सतर्क राहण्याची गरज आहे.