‘कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके, अमल महाडिक यांनी सहकार्य करावं’; मुख्यमंत्र्यांसमोरच हसन मुश्रीफांनी टोचले कान!
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर शहराची हद्दवाढ झाल्याशिवाय शहराचा अपेक्षित विकास आणि प्रगती होणार नाही, अशी ठाम भूमिका घेत वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आमदार चंद्रदीप नरके आणि नेते अमल महाडिक यांना हद्दवाढीसाठी सहकार्य करण्याचे जाहीर आवाहन केले. कोल्हापूर शहराची एक इंचानेही हद्दवाढ न झाल्यामुळे शहराची वाताहत झाली असल्याचे सांगत त्यांनी या मुद्यावर भर दिला. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हद्दवाढीचे निवेदन सुपूर्द करण्यात आले.

महापौर रुपाराणी निकम आणि राजेश क्षीरसागर यांची मागणी
या कार्यक्रमात बोलताना कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर रुपाराणी निकम म्हणाल्या की, महापालिकेच्या नवीन इमारतीसाठी केवळ २ एकर जागेची मागणी केली होती; परंतु तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका मिनिटाचाही विलंब न लावता ती ५ एकर जागा तात्काळ मंजूर करून दिली. महायुतीचा पहिला महापौर म्हणून याच नवीन जागेवर मनपाची नवी इमारत उभी राहावी, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. तसेच त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे कोल्हापूरच्या हद्दवाढीचा प्रश्न जोरदारपणे मांडला. आमदार राजेश क्षीरसागर यांनीही आपल्या मनोगतात कोल्हापूरच्या हद्दवाढीची निकड अधोरेखित केली.
"कोल्हापूरकरांना उपचारासाठी मुंबई-पुण्याला जावे लागणार नाही"
कोल्हापूर शहरातील इतर समस्यांवर बोलताना मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, महापौर आणि आमदार राजेश क्षीरसागर यांनी शहरातील विविध प्रश्न आधीच मांडले आहेत, त्यामुळे मी त्याची पुनरावृत्ती करणार नाही. मात्र, माझ्या विभागांतर्गत येत असलेल्या छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (CPR) आणि शेंडा पार्क येथे अमेरिकेच्या 'ह्युस्टन' शहराच्या धर्तीवर एक भव्य मेडिकल हब साकारण्यात येत आहे.
पुढे बोलताना मुश्रीफ म्हणाले, "मी कोल्हापूरच्या जनतेला विश्वास देऊ इच्छितो की, आगामी एक-दोन वर्षांत अशी व्यवस्था निर्माण करू, ज्यामुळे कोल्हापूरसह कर्नाटक आणि कोकणातील नागरिकांना उपचारासाठी मुंबई किंवा पुण्याला जाण्याची अजिबात गरज भासणार नाही." मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या सहकार्याने हा प्रकल्प प्रत्यक्षात आणून दाखवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
४७३ कोटींचा निधी आणि आरोग्य क्षेत्राचा कायापालट
शहराचा चेहरामोरा बदलण्यासाठी महायुती सरकारने सढळहस्ते मदत केल्याचे सांगत मुश्रीफ म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून तब्बल ४७३ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. शेंडा पार्कमध्ये ६०० बेडचे सामान्य रुग्णालय, २५०० बेडचे कॅन्सर हॉस्पिटल आणि २५०० बेडचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारले जात आहे. तसेच एमबीबीएस, एमडी आणि एमएसचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी अत्यंत उत्तम शैक्षणिक आणि वैद्यकीय व्यवस्था तिथे निर्माण केली जात असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.




