कोल्हापूर अंबाबाई मंदिरात गळती? संवर्धनाच्या कामावर गंभीर प्रश्नचिन्ह, व्हिडिओ व्हायरल
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूरकरांचे आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात पावसामुळे पाणी गळती लागल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या गळतीमुळे मंदिराच्या जतन आणि संवर्धनाच्या सुरू असलेल्या कामांवर आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सध्या अंबाबाई मंदिरात तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्याचे काम सुरू आहे. हे काम पुरातत्त्व विभागाच्या देखरेखीखाली अत्यंत काळजीपूर्वक होणे अपेक्षित असताना, थेट मंदिरातच गळती लागल्याचे समोर आले आहे. हा व्हिडिओ सोमवारपासून सोशल मीडियावर व्हायरल होत असून, यामुळे भाविकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मंदिरातील अंतर्गत आणि बाह्य नक्षीकाम, विविध कलाकुसर आणि मूर्तींचे मूळ रूप जतन करण्यासाठी सध्या संवर्धनाचे काम केले जात आहे. मात्र, हे काम करताना चक्क 'ग्राईंडर'चा वापर केला जात असल्याचा आरोप होत आहे. ग्राईंडरच्या वापरामुळे मंदिराच्या मूळ दगडी रचनेला आणि सौंदर्याला बाधा पोहोचण्याची भीती व्यक्त केली जात असून, याच निष्काळजीपणामुळे मंदिरात पाणी गळती लागल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
या गंभीर प्रकारानंतर शिवसेनेचे हर्षल सुर्वे यांनी प्रशासनावर तोफ डागली आहे. मंदिरात सुरू असलेले काम निकृष्ट दर्जाचे आहे का? किंवा कोणत्या कारणामुळे ही गळती लागली, याचा जाब थेट देवस्थान समिती आणि जिल्हा प्रशासनाला विचारला जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
लाखो भाविकांच्या भावना जोडल्या गेलेल्या या ऐतिहासिक वास्तूच्या संवर्धनाबाबत एवढा हलगर्जीपणा का केला जात आहे? प्रशासन यावर काय कारवाई करणार, याकडे आता संपूर्ण कोल्हापूरकरांचे लक्ष लागले आहे.




