कोल्हापूर-राधानगरी मार्गावर भीषण अपघात; तिघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी
कोल्हापूर (प्रतिनिधी) - कोल्हापूर - राधानगरी मार्गावरील कौलव ते सिरसे दरम्यान १२ च्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला असून, एकजण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात आयशर टेम्पोने मोटारसायकलला दिलेल्या जोरदार धडकेमुळे घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, आयशर टेम्पो राधानगरीकडून कोल्हापूरकडे अतिवेगाने जात होता. त्याच वेळी भोगावतीकडून राधानगरीकडे चार जण मोटारसायकलवरून जात होते. कौलव येथील श्री दत्त मंदिराजवळ टेम्पो चुकीच्या दिशेने आल्यामुळे त्याने मोटारसायकलला जोरदार धडक दिली.
या अपघातात मोटारसायकलवरील श्रीकांत बाबासो कांबळे व त्यांची पुतणी शिवाज्ञा सचिन कांबळे (दोघेही रा. तरसांबळे) यांचा जागीच मृत्यू झाला. श्रीकांत यांची बहिण दिपाली गुरुनाथ कांबळे आणि तिचा मुलगा अथर्व गुरुनाथ कांबळे (रा. शेंदूर, ता. कागल) गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान दिपाली गुरुनाथ कांबळे यांचा मृत्यू झाला.
अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे कोल्हापूर - राधानगरी मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा सुरू केला आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.




