'गोकुळ केसरी' कुस्ती स्पर्धा पुन्हा रंगणार - नविद मुश्रीफ
कोल्हापूर (प्रतिनिधी) - जिल्ह्यातील पारंपरिक कुस्तीला नेहमीच बळ देण्याची भूमिका ‘गोकुळ’ ने घेतली आहे. काही वर्षांपासून बंद असलेली प्रतिष्ठित ‘गोकुळ केसरी’ कुस्ती स्पर्धा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय गोकुळ संचालक मंडळाने घेतला असल्याची माहिती अध्यक्ष नविद मुश्रीफ यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे दिली.

‘गोकुळ’ च्या वतीने राज्य व राष्ट्रीय स्तरावरील गोकुळ केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित केल्या जात होत्या. मात्र काही कारणांमुळे गेल्या काही वर्षांपासून या स्पर्धा थांबल्या होत्या. अलीकडे कोल्हापुरातील विविध तालीम संघटनांचे पदाधिकारी, मल्ल आणि कुस्तीप्रेमी यांनी संचालक मंडळ तसेच नेतेमंडळींची भेट घेऊन स्पर्धा पुन्हा सुरू करण्याची मागणी केली होती.
या मागणीचा सकारात्मक विचार करून झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत स्पर्धा पुनः सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कालावधी संपल्यानंतर लगेचच या स्पर्धांचे आयोजन करण्यात येईल, असे अध्यक्ष नविद मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.




