डॉ. पत्की यांना 'डॉ. अतुल जोगळेकर जीवनगौरव पुरस्कार' जाहीर
कोल्हापूर (प्रतिनिधी) - कोल्हापूर मेडिकल असोसिएशन शाखा इंडियन मेडिकल असोसिएशन तर्फे १ व २ नोव्हेंबर रोजी वैद्यकीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. परिषदेची थिम 'फेसिंग द फ्युचर टुगेदर फ्रॉम कनेक्शन टू क्युअर' अशी असून दोन दिवस चालणाऱ्या परिषदेत देश - विदेशातील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. हॉटेल सयाजी येथे शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजता विधानपरिषदेचे अध्यक्ष प्रा. राम शिंदे, प्रमुख पाहुणे इस्त्रो उपसंचालक डॉ. एस. व्ही. शर्मा, डॉ. आय. बी. विजयलक्ष्मी यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन होणार असल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. आर. एम. कुलकर्णी यांनी दिली. तसेच, असोसिएशनतर्फे 'डॉ. अतुल जोगळेकर जीवनगौरव पुरस्कार' स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सतीश पत्की यांना जाहीर झाला असून २ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता पुरस्कार वितरीत करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाला आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आ. राजेश क्षीरसागर, आ. सतेज पाटील, आ. अमल महाडिक उपस्थित राहणार आहेत. परिषदेत हेमॅटॉलॉजिस्ट डॉ. एम. बी. अगरवाल, न्यूरॉलॉजिस्ट डॉ. सतीश खाडिलकर, सिडनी (ऑस्ट्रेलिया) येथील क्रिटिकल केअर तज्ज्ञ डॉ. उमेश शहा, पुण्याचे अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. एन. जे. कर्णे, डायबेटॉलॉजिस्ट डॉ. शैलजा काळे, वंध्यत्व तज्ज्ञ डॉ. सुप्रिया पुराणिक, यकृत प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. बिपीन विभुते, डॉ. हंचनाळे, बेंगळुरचे न्यूरोसर्जन डॉ. विकास मार्गदर्शन करणार आहेत.
'डॉक्टर आणि जनतेचा संवाद मंच' याद्वारे 'आरोग्य, आहार आणि आध्यात्मिक नाते' या विषयावर दुपारी ३.३० ते ५.३० या वेळेत सर्वांसाठी खुले व मोफत चर्चासत्र होणार आहे. या चर्चासत्रात आहार तज्ज्ञ डॉ. जगन्नाथ दीक्षित, योग तज्ज्ञ डॉ. समप्रसाद विनोद, हृदयरोग तज्ज्ञ डॉ. आय. बी. विजयलक्ष्मी मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमात केरळमधील वादकचमूचे फ्युजन इन्स्ट्रुमेंटल म्युझिक व कार्यशाळा विशेष आकर्षण असणार आहे.
यावेळी डॉ. ए. बी. पाटील, सचिव डॉ. अरुण धुमाळे, परिषदेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र चिंचणीकर, डॉ. शरद टोपकर, डॉ. संदीप पाटील, डॉ. शीतल पाटील उपस्थित होते.




