जिल्हा परिषद - पंचायत समिती निवडणुकीसाठी राजे समरजितसिंह घाटगे यांच्याकडे इच्छुकांची भाऊगर्दी

जिल्हा परिषद - पंचायत समिती निवडणुकीसाठी राजे समरजितसिंह घाटगे यांच्याकडे इच्छुकांची भाऊगर्दी

कागल (प्रतिनिधी) - जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्री छत्रपती शाहू आघाडीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक उमेदवारांनी शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष व श्री छत्रपती शाहू आघाडीचे नेते राजे समरजितसिंह घाटगे यांची भेट घेऊन उमेदवारीची मागणी केली. यावेळी इच्छुक उमेदवारांनी मोठ्या संख्येने समर्थकांसह उपस्थित राहून जोरदार शक्ती प्रदर्शन केले.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापू लागले असून, श्री छत्रपती शाहू आघाडीच्या वतीने निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी कोल्हापूर येथे राजे समरजितसिंह घाटगे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान इच्छुक उमेदवारांनी आपली ताकद दाखवून देत समर्थकांसह मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. आपल्या उमेदवारीची जोरदारपणे मागणी केली.

यावेळी इच्छूक उमेदवार व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना राजे समरजितसिंह घाटगे म्हणाले की, युतीसंदर्भातील निर्णयानुसारच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका लढविण्यात येतील.

युतीमध्ये जो निर्णय होईल, त्याला सर्वांनी  पाठिंबा द्यावा.व्यक्तिगत इच्छेपेक्षा संघटना व युतीचा निर्णय महत्त्वाचा असून, ज्या उमेदवारांना उमेदवारी मिळेल, त्यांना विजयी करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी जोमाने, प्रामाणिकपणे आणि निष्ठेने काम करावे,शाहू आघाडी व युतीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत.असे आवाहनही त्यांनी केले.

या भेटीदरम्यान शाहू आघाडीचे पदाधिकारी, विविध विभागांचे कार्यकर्ते व मोठ्या संख्येने समर्थक उपस्थित होते.