जिल्हा परिषद शाळांतील स्वच्छतागृहांची दुरुस्ती करा ; शिक्षण सभापती शीतल यादव यांची सूचना
कोल्हापूर/प्रतिनिधी : जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतागृहांची सुविधा अपुरी असून अनेक ठिकाणी त्यांची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे उपलब्ध निधीतून स्वच्छतागृहांची तातडीने दुरुस्ती करून विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी सूचना जिल्हा परिषद शिक्षण व अर्थ समितीच्या सभापती शीतल यादव यांनी दिली.

जिल्हा परिषद शिक्षण समितीची आढावा बैठक सभापती यादव यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी पार पडली. या वेळी जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्ता, शाळांमधील मूलभूत सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या हिताच्या विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये मुला-मुलींसाठी स्वच्छतागृहांची सुविधा अपुरी असल्याचे बैठकीत निदर्शनास आले. काही ठिकाणी स्वच्छतागृहांची दुरावस्था झाली आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित गटशिक्षणाधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई करावी, अशा सूचना देण्यात आल्या. जिल्हा वार्षिक योजना, पंधरावा वित्त आयोग, ग्रामपंचायतींचा निधी तसेच उपलब्ध अन्य निधीतून स्वच्छतागृहांची दुरुस्ती प्राधान्याने करावी, असे यादव यांनी सांगितले.
गुणवत्तापूर्ण शिक्षणातून सक्षम आणि सुसंस्कृत पिढी घडवण्याची जबाबदारी सामूहिकपणे पार पाडण्याची गरज असून, सेवाभावी शिक्षकांनी कमी पटसंख्येच्या तसेच शिक्षकांची कमतरता असलेल्या शाळांमध्ये अध्यापनासाठी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.
बैठकीस समिती सदस्य एकनाथ पाटील, अमरसिंह चव्हाण, रेखाताई मुगडे, भगवान पाटील, स्नेहल वेल्हाळ, शुभांगी कुंभार, सानिका आवाडे, शिक्षणाधिकारी गुघे, सर्व गटशिक्षणाधिकारी तसेच शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.




