जि. प. स्थायी समितीच्या बैठकीत सदस्य आक्रमक; निष्काळजी अधिकाऱ्यांची केली कानउघाडणी,
कोल्हापूर/प्रतिनिधी: कोल्हापूर जिल्हा परिषदेची स्थायी समितीची बैठक आज पार पडली. या बैठकीत विविध प्रलंबित प्रश्नांवरून आणि प्रशासकीय ढिसाळ कारभारावरून जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि समितीच्या सदस्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. मागील बैठकीत मागवलेले अहवाल सादर न केल्यामुळे आक्रमक झालेल्या सदस्यांनी अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावत, चांगलीच कान उघडणी केली. चार दिवसांत सर्व अहवाल सादर करण्याच्या सूचना कडक शब्दात दिल्या. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा खोत होत्या.

आरोग्य भरती अहवालावरून सदस्य भडकले
मागील स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या कंत्राटी आरोग्य भरतीबाबत जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे सविस्तर अहवाल मागितला होता. मात्र, आजच्या महत्त्वाच्या बैठकीला खुद्द डीएचओ अनुपस्थित राहिले. त्यामुळे सदस्यांनी या विभागाच्या दुसऱ्या अधिकाऱ्याकडे अहवालाबाबत विचारणा केली असता, त्यांनी 'अहवाल आणलाच नाही' असे उत्तर दिले. या बेजबाबदार उत्तरामुळे स्थायी समितीचे सदस्य अत्यंत आक्रमक झाले. प्रशासनाकडून लोकप्रतिनिधींच्या प्रश्नांना केराची टोपली दाखवली जात असल्याचा संताप व्यक्त करत, सदस्यांनी येत्या चार दिवसांत भरती प्रकरणाचा संपूर्ण अहवाल सादर करण्याचे कडक आदेश अधिकाऱ्यांना दिले.
जीआर आणि परिपत्रके आधी देण्याच्या सूचना
या वेळी सदस्य संग्रामसिंह कुपेकर, अभिजीत तायशेटे यांनी आरोग्य विभागासोबतच प्रशासकीय कामकाजातील त्रुटींवरून अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली . शासनाचे जीआर आणि महत्त्वाची परिपत्रके बैठकीच्या दिवशीच सदस्यांसमोर ठेवली जातात, या पद्धतीवर सदस्यांनी तीव्र आक्षेप घेतला. "ऐन बैठकीच्या वेळी माहिती न देता, बैठकीच्या आधीच सर्व जीआर, परिपत्रके आणि माहिती सदस्यांना अभ्यासासाठी उपलब्ध करून देण्यात यावी," अशा कडक सूचना अध्यक्षा शिल्पा खोत व उपाध्यक्ष तानाजी पाटील यांनी प्रशासनाला दिल्या.
अधिकाऱ्यांना ब्रेक देऊन बाहेर पाठवले; सभागृहाचा दरवाजा बंद करून चर्चा
दरम्यान, बैठकीत परिपत्रकांचे वाचन, चर्चा आणि प्रश्नोत्तरांचा तास पूर्ण झाल्यानंतर एक घटना घडली. समितीच्या सदस्यांनी उपस्थित असलेल्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना चहा-नाश्त्यासाठी ब्रेक घेण्यास सांगून बैठकीच्या सभागृहाबाहेर जाण्यास सांगितले. सर्व अधिकारी बाहेर गेल्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्यांनी प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर नियंत्रण कसे मिळवायचे आणि अधिकाऱ्यांवर वचक कसा ठेवायचा, यावर बंद दाराआड सखोल चर्चा करत पुढील रणनीती आखली.
या बैठकीस सदस्य अमरसिंह पाटील,अभिजीत तायशेटे, संग्रामसिंह कुपेकर, रेश्मा देसाई, सुधीर देसाई, शिवाजी जाधव, जयंत पाटील यांच्यासह विभाग प्रमुख, अधिकारी उपस्थित होते.
जिल्हा परिषद आवारात उलट-सुलट चर्चा
स्थायी समितीच्या बैठकीदरम्यान सदस्यांनी अचानक सर्व अधिकाऱ्यांना बाहेर घालवल्याची बातमी समजताच या प्रकारामुळे जिल्हा परिषदेच्या आवारात विविध चर्चांना उधाण आल. स्थायी समिती बैठकीबाबत जि. प.कर्मचाऱ्यांमध्ये कुजबूज सुरू होती. काही दिवसापूर्वी झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेतून प्रशासनाने काय बोध घेतला? हा आजच्या स्थायी समितीच्या बैठकीच्या निमित्ताने प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे पुढील स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांची रणनीती यशस्वी ठरणार का ? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.




