'जे कधी शाळेत गेले नाहीत ते सरकार चालवत आहेत'; अभिजीत दिपकेंचा सरकारवर हल्लाबोल, बेरोजगारीपासून न्यायव्यवस्थेपर्यंत साधला निशाणा
मुंबई (प्रतिनिधी) :सुशिक्षित बेरोजगारांपैकी 80 टक्के लोकांकडे पदव्या आहेत. देशातील तरुणांच्या मनात आता प्रश्न निर्माण झाला आहे की, "आम्ही शिकून चूक केली का?" कारण ज्यांनी कधी फॉर्मल डिग्री घेतली नाही ते सरकार चालवत आहेत, निर्णय घेत आहेत, तर मेहनत करून शिक्षण घेतलेल्या तरुणांचे भविष्य अशिक्षित लोक ठरवत आहेत, अशा शब्दांत कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी सरकारवर टीका केली. बेरोजगारी हा आता निवडणुकांचा आणि राजकीय चर्चेचा मुख्य मुद्दा बनवायचा आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

अभिजित दिपके म्हणाले, "जर कोणी तुम्हाला सांगत असेल की एखादी एक व्यक्ती किंवा एकच संघटना देशातील सर्व समस्या सोडवेल, तर ते खोटं आहे. 2014 मध्येही देशाला अशाच प्रकारची आश्वासनं देण्यात आली होती की एक व्यक्ती देश बदलू शकते, पण प्रत्यक्षात तसं झालेलं नाही. कोणतीही एक व्यक्ती किंवा संस्था देशाचे सर्व प्रश्न सोडवू शकत नाही."
ते पुढे म्हणाले, "ज्या सामाजिक संघटना, कार्यकर्ते आणि सिव्हिल सोसायटीने आम्हाला पाठिंबा दिला आहे, त्या सर्वांना सोबत घेऊन आम्ही एकजूट निर्माण करू. आता राजकीय विचारसरणीच्या पलीकडे जाऊन नागरिक म्हणून देशात बदल घडवण्याची गरज आहे."
दिपके यांनी सांगितले की, कॉकरोच जनता पार्टी सप्टेंबर महिन्यात "क्या बोलती पब्लिक" हे राष्ट्रीय अभियान सुरू करणार आहे. "या देशव्यापी दौऱ्यात आम्ही लोकांशी थेट संवाद साधू. त्यांच्या समस्या, अपेक्षा आणि अडचणी समजून घेऊ. कारण सध्याचे सत्ताधारी आणि अनेक राजकीय पक्ष लोकांपासून पूर्णपणे दुरावले आहेत. लोकांचं म्हणणं ऐकून घेण्याची त्यांची तयारी राहिलेली नाही," असे ते म्हणाले.
सरकारवर टीका करताना दिपके म्हणाले, "सरकारला फक्त हिंदू-मुस्लीम हा एकच मुद्दा दिसतो. पण बेरोजगारी, देशाची आर्थिक परिस्थिती आणि शिक्षणाची बिकट अवस्था यावर कोणी बोलायला तयार नाही. आज शिक्षण इतकं महाग झालं आहे की सामान्य कुटुंबासाठी ते परवडणं कठीण झालं आहे. पहिली-दुसरीच्या विद्यार्थ्यांची फी लाखोंमध्ये पोहोचली आहे. त्यात डोनेशन, कॉलेजच्या वाढलेल्या फी आणि कोचिंग क्लासेसचा खर्च यामुळे पालकांवर मोठा आर्थिक बोजा पडत आहे."
राजकीय घडामोडींवर भाष्य करताना ते म्हणाले, "सकाळी जनता एका पक्षाला मतदान करते आणि संध्याकाळी तोच आमदार दुसऱ्या पक्षात जातो. सरकार बदललं नाही तर ईडी, सीबीआयचा वापर करून पक्ष फोडले जातात. तेही पुरेसं नसेल तर कोर्टातून पक्षही हिसकावले जातात. त्यामुळे लोकांचा राजकीय व्यवस्थेवरील विश्वास कमी होत आहे."
न्यायव्यवस्थेबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. "सामान्य माणसाला न्यायालयात 'तारीख पे तारीख' मिळते. पण मोठे उद्योगपती किंवा मोठ्या राजकीय प्रकरणांमध्ये तातडीने सुनावणी होते. पक्षफोड किंवा आमदारांशी संबंधित प्रकरणांमध्येही न्यायालयाकडून वेगाने निर्णय होतात. मात्र सामान्य नागरिकांना न्याय मिळण्यासाठी बराच काळ वाट पाहावी लागते," असा आरोप अभिजित दिपके यांनी केला.




