'ज्ञानोबा-तुकाराम'च्या गजरात कोगेकरांची पायी दिंडी पंढरीकडे रवाना; ४० वर्षांची परंपरा कायम

'ज्ञानोबा-तुकाराम'च्या गजरात कोगेकरांची पायी दिंडी पंढरीकडे रवाना; ४० वर्षांची परंपरा कायम

विश्वनाथ मोरे (करवीर तालुका/प्रतिनिधी) : आषाढी वारीच्या निमित्ताने संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रासह करवीर तालुक्यात विठ्ठल भक्तीचा अथांग सागर ओसंडून वाहत आहे. तालुक्यातील गावोगावातून दिंड्या पंढरपूरकडे कूच करत असतानाच, कोगे येथील वारकरी संप्रदायाची ४० वर्षांची पायी दिंडी परंपरा राखत 'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या जयघोषात पंढरीच्या दिशेने रवाना झाली.

कोगे गावाची ही दिंडी परंपरा १९८६ पासून सुरू आहे. सुरुवातीला आरे गावचे दिनकर दादा वरुटे यांच्या दिंडीतून कोगे येथील कै. कृष्णात पाटील, कै. रामचंद्र पाटील, कै. मारुती मोरे, कै. मारुती तोडकर आणि कै. मारुती भाऊ मोरे यांनी या वारीचा पाया रचला. पुढे १९९३ पासून प्रत्यक्ष गावातून स्वतंत्र दिंडी सुरू झाली. त्यानंतर दिनकर धोंडी पाटील आणि भीमराव द्वारकू मोरे यांनी ही धुरा सांभाळली. सध्या २००० सालापासून शिवाजी लहू मोरे, बाळासो कृष्णात पाटील, सारंग चव्हाण, आणि विशाल पाटील ही नवी पिढी बालवृद्धांना सोबत घेऊन ही संस्कृती पुढे चालवत आहे.

दिंडी प्रस्थानावेळी गावातील वातावरण विठ्ठलमय झाले होते. टाळ-मृदंगाचा गजर आणि भगव्या पताक्यांनी परिसर दुमदुमून गेला. या सोहळ्यासाठी कोगे गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी, तरुण मंडळे, महिला भाविक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.