ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर अभिनेत्री सोनाली कुलकर्णी म्हणाली...
मुंबई - मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने केवळ मराठीतच नव्हे तर हिंदी आणि मल्याळम चित्रपटांमधूनही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. मात्र यावेळी ती तिच्या चित्रपटांमुळे नव्हे, तर एका राजकीय विषयावर दिलेल्या मतामुळे चर्चेत आली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सोनाली कुलकर्णीला विचारण्यात आलं की, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर सोनाली कुलकर्णी म्हणाली, "हे फारच हायपोथेटिकल आहे. त्यामुळे यावर स्पष्ट काही सांगणं कठीण आहे. जोपर्यंत खुद्द ठाकरे बंधू औपचारिक घोषणा करत नाहीत, तोपर्यंत चर्चांवर विश्वास ठेवावा का, हेही प्रश्नचिन्ह आहे. पण जर हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय परिस्थितीसाठी फायदेशीर असेल, तर ते निश्चितच घडावं आणि टिकावंही."

गेल्या काही आठवड्यांपासून ठाकरे बंधूंमध्ये वाढती भेटीगाठी आणि सार्वजनिक कार्यक्रमांतील उपस्थितीमुळे एकत्र येण्याच्या शक्यतेला उधाण आलं आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे यांचं कुटुंब राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गेलं होतं, त्यानंतर चर्चा अधिकच वाढल्या.
दरम्यान, सोनाली कुलकर्णीने 'बकुळा नामदेव घोटाळे' या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. नंतर 'नटरंग', 'झिम्मा', 'मितवा', 'पांडू', 'पोश्टर गर्ल', 'हिरकणी' यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांतून तिने प्रेक्षकांची मनं जिंकली. हिंदी चित्रपटसृष्टीतही तिने आपली छाप सोडली आहे.




