डीजे-डॉल्बीच्या वादावर राज ठाकरेंचा संताप, दंगलीच्या इशाऱ्यावरून हिंदू-मुसलमानांना सतर्कतेचे आवाहन

डीजे-डॉल्बीच्या वादावर राज ठाकरेंचा संताप, दंगलीच्या इशाऱ्यावरून हिंदू-मुसलमानांना सतर्कतेचे आवाहन

ठाणे: डीजे आणि डॉल्बीच्या वापरावरून मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी ( सप्टेंबर) ठाण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात आक्रमक भूमिका घेतली. सण-उत्सवांमध्ये कर्णकर्कश डीजे आणि डॉल्बी लावून गोंधळ घालण्याच्या प्रकारावर त्यांनी तीव्र शब्दांत ताशेरे ओढले. धर्माचा अभिमान नक्की असावा, मात्र धर्मांध होऊ नये, असे सांगत सण साजरे करताना उत्तर प्रदेश किंवा बिहारमधील संस्कृती महाराष्ट्रात आणू नका, असे खडे बोल त्यांनी सुनावले.

राज्यात सध्या डीजेबंदीसाठी तीव्र आवाज उठवला जात असून, पुण्यातून विद्यानंद बापट यांनी पुढाकार घेतला आहे. मात्र, यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अद्याप स्पष्ट बोलले नसल्याचे सांगत राज ठाकरेंनी नागपूरचे उदाहरण दिले. नागपुरात डीजे बंद होऊ शकतो, मग उर्वरित महाराष्ट्रात का नाही? असा सवाल त्यांनी केला. नागरिकांना जाणीवपूर्वक अशा वादांमध्ये गुंतवून ठेवले जात असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला.

दंगली घडवण्याच्या कटावर राज ठाकरेंचा इशारा
येणाऱ्या सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर दंगली भडकवण्याची शक्यता वर्तवत राज ठाकरेंनी उपस्थितांना गांभीर्याने विचार करायला लावला. गणपतीच्या दिवसांत जाणीवपूर्वक दंगली घडवून लोकांना त्यात अडकवले जाईल आणि इतर महत्त्वाच्या मुद्यांवरून लक्ष विचलित केले जाईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. हा सर्व लोकांमध्ये एकमेकांबद्दल दुस्वास निर्माण करण्याचा मोठा कट असल्याचा आरोप करत, सर्व सुजाण हिंदू आणि मुसलमानांनी अतिशय सतर्क राहण्याचे आवाहन राज ठाकरेंनी केले. सण-उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरे करावेत आणि यासाठी स्पष्ट नियम असावेत, असे मत त्यांनी यावेळी मांडले.