तमिळनाडू विधानसभेत CM विजय यांची पुन्हा एकदा गुगली! विरोधकांनी घेरण्याचा प्रयत्न करताच केली अनोखी कृती; विधानसभेच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
मुंबई (प्रतिनिधी) : तमिळनाडू विधानसभेत एक अनोखं दृश्य पाहायला मिळालं. मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी आपली राखीव जागा सोडून मंत्र्यांमध्ये बसून चर्चा केली. विधानसभेच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या मुख्यमंत्र्यांनी आपली राखीव जागा सोडून मंत्र्यांसाठी राखीव असलेल्या जागेवर बसून कामकाजात सहभाग घेतल्याचं सांगितलं जात आहे.विजय हे सभागृह नेते आणि मंत्री के. ए. सेंगोत्तैयन आणि मंत्री आधव अर्जुन यांच्यामध्ये बसले होते. विधानसभेत अध्यक्षांच्या आसनाजवळ मुख्यमंत्र्यांसाठी स्वतंत्र जागा असते. तर मंत्री पुढच्या रांगेत बसतात आणि त्यांच्या जागा साधारणपणे ज्येष्ठतेनुसार ठरवल्या जातात.

आमदार आणि मंत्री कधीकधी आपापसात चर्चेसाठी जागांची अदलाबदल करतात. मात्र, मुख्यमंत्र्यांनी स्वतःची राखीव जागा सोडून मंत्र्यांच्या आसनावर बसणं ही नेहमीची बाब नाही. त्यामुळे विजय यांच्या या कृतीची विधानसभेत चर्चा रंगली.विजय यांनी जागा बदलण्यापूर्वी विधानसभेतील महत्त्वाच्या विषयांवरील चर्चेदरम्यान वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. विरोधी पक्षनेते उदयनिधी स्टॅलिन यांनी चर्चेदरम्यान विभागीय सचिव सभागृहात का उपस्थित नव्हते, असा सवाल केला.
करूर येथील चेंगराचेंगरीचा संदर्भ देत उदयनिधी स्टॅलिन म्हणाले की, मागील डीएमके सरकारच्या काळात महत्त्वाच्या विषयांवरील चर्चेदरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, मुख्य सचिव आणि संबंधित विभागांचे सचिव सभागृहात उपस्थित असायचे.सध्याच्या अधिवेशनात मात्र अधिकाऱ्यांची अशी उपस्थिती दिसून येत नसल्याचं उदयनिधी यांनी सांगितलं.
उदयनिधींच्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री आधव अर्जुन यांनी सांगितलं की, विभागीय सचिव विधानसभेजवळील 'वॉर रूम'मध्ये उपस्थित होते. सभागृहात आमदारांनी उपस्थित केलेले मुद्दे आणि त्यांच्या भाषणांवर टिपणं तयार करण्याचं काम ते करत होते.
खुर्चीपासून पोशाखापर्यंत, विजय यांची वेगळी कार्यशैली
10 मे 2026: विजय यांनी काळ्या रंगाचा सूट परिधान करून मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तामिळनाडूच्या राजकारणात नेते सहसा पांढरा शर्ट आणि दक्षिण भारतीय धोती परिधान करून शपथ घेतात.
12 मे 2026: विजय यांनी त्यांचे वैयक्तिक ज्योतिषी रिकी राधन पंडित यांची विशेष कार्य अधिकारी म्हणजेच OSD म्हणून नियुक्ती केली. या निर्णयावरून मोठा वाद निर्माण झाला. त्यानंतर ही नियुक्ती मागे घेण्यात आली आणि 13 मे रोजी त्यांनी राजीनामा दिला.
13 मे 2026: विजय यांनी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव सादर केला. टीव्हीकेच्या मते, या विश्वासदर्शक ठरावादरम्यान तामिळनाडू विधानसभेच्या कामकाजाचं थेट प्रक्षेपण करण्यात आलं, जे विधानसभेच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं.
विजय सचिवालयात वेळेवर पोहोचतात आणि अंदाजे सात तास आपल्या डेस्कवर काम करतात. अधिकाऱ्यांमध्येही वक्तशीरपणावर भर दिला जात असल्याचं सांगितलं जात आहे. अहवालानुसार, विजय स्वतःचं जेवण सोबत घेऊन येतात आणि आपल्या केबिनमध्येच जेवतात.त्यामुळे पोशाख असो, काम करण्याची पद्धत असो किंवा आता विधानसभेतील जागा बदलण्याची कृती असो, मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांची वेगळी कार्यशैली सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.




