दहीहंडी उत्सवाला गालबोट: मुंबईत ७ वर्षांच्या बालकाचा तर पुण्यात महिलेचा मृत्यू; मुंबईत ३०६ गोविंदा जखमी
मुंबई / पुणे: राज्यभरात मोठ्या उत्साहात पार पडलेल्या दहीहंडी उत्सवाला मुंबई आणि पुण्यात झालेल्या दुर्दैवी घटनांमुळे गालबोट लागले आहे. वेगवेगळ्या अपघातांमध्ये मुंबईत एका ७ वर्षांच्या चिमुकल्याचा, तर पुण्यात एका महिलेचा मृत्यू झाला. तसेच मुंबईत उत्सव साजरा करताना विविध ठिकाणी तब्बल ३०६ गोविंदा जखमी झाले असून, त्यापैकी ५५ जणांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, पुण्यात नियमांचे उल्लंघन करत डीजे वाजवल्याप्रकरणी ध्वनीप्रदूषणाचा पहिला गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

मुंबईत थर रचताना चिमुकल्याचा दुर्दैवी अंत
मुंबईतील मालवणी (मार्वे रोड, चिकूवाडी) येथे मित्रांसोबत लहान मुलांची दहीहंडी साजरी करत असताना रुद्र कदम या ७ वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाला. झाड आणि एका कच्च्या विटांच्या खांबाला दोरी बांधून ही हंडी टांगण्यात आली होती. हंडी फोडण्याच्या प्रयत्नात दोरीचा ताण येऊन विटांचा खांब थेट रुद्रच्या अंगावर कोसळला. अत्यंत गंभीर जखमी झालेल्या रुद्रला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
पुण्यात स्टेजची कमान अंगावर पडल्याने महिलेचा मृत्यू
पिंपरी-चिंचवडमधील सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुसरी दुर्घटना घडली. दहीहंडी कार्यक्रम पार पडल्यानंतर स्टेजची लोखंडी कमान काढण्याचे काम सुरू असताना ती अचानक अंगावर कोसळून सलमा पठाण नावाच्या महिलेचा मृत्यू झाला.
ध्वनीप्रदूषणाचा पहिला गुन्हा दाखल
राज्यभरात डीजे आणि आवाजाच्या मर्यादेवरून वाद सुरू असताना, पुण्यात बिबवेवाडी येथील एका दहीहंडी मंडळावर ध्वनीप्रदूषणाचा पहिला गुन्हा नोंदवण्यात आला आहे. केवळ ४ बेस आणि ४ टॉप स्पीकरची परवानगी असताना मंडळाने ८ बेस आणि ८ टॉप स्पीकर लावून नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
मुंबईतील जखमी गोविंदांची स्थिती
मुंबई महापालिका आणि विविध शासकीय रुग्णालयांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री १२ वाजेपर्यंत एकूण ३०६ गोविंदा जखमी झाले. यापैकी २०२ जणांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले असून ४९ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
विभागनिहाय जखमींची आकडेवारी:
शहर (City): जखमी - १५४ | दाखल - २९ | उपचाराधीन - ३१ | डिस्चार्ज - ९४
पूर्व उपनगरे (ES): जखमी - ५७ | दाखल - ११ | उपचाराधीन - ०० | डिस्चार्ज - ४६
पश्चिम उपनगरे (WS): जखमी - ९५ | दाखल - ०९ | उपचाराधीन - २४ | डिस्चार्ज - ६२
प्रमुख रुग्णालयामांमधील नोंद:
केईएम: ५५ जखमी (१८ दाखल, ३७ डिस्चार्ज)
नायर: २५ जखमी (३ दाखल, २२ डिस्चार्ज)
सायन: १६ जखमी (४ दाखल, ४ उपचाराधीन, ४ डिस्चार्ज)
राजवाडी: २८ जखमी (११ दाखल, १७ डिस्चार्ज)
पोतदार: २० जखमी (सर्व २० डिस्चार्ज)
बीडीबीए (कांदिवली): १८ जखमी (२ दाखल, १६ डिस्चार्ज)
हिंदुजा: १४ जखमी (२ दाखल, १२ डिस्चार्ज)




