धुरंधरच्या यशासोबत 'त्या' व्हायरल ट्रेंडवर अंकिता वालावलकरने केला संताप व्यक्त

धुरंधरच्या यशासोबत 'त्या' व्हायरल ट्रेंडवर अंकिता वालावलकरने केला संताप व्यक्त

मुंबई - रणवीर सिंग आणि अक्षय खन्ना यांच्या स्पाय थ्रिलर ‘धुरंधर’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार धुमाकूळ घातला आहे. कमाईचा वेग अजूनही कायम असून, यावर्षी प्रदर्शित झालेल्या सर्व प्रमुख चित्रपटांना मागे टाकत ‘धुरंधर’ तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. चित्रपटातील गाणीही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, बॉलिवूड आणि टेलिव्हिजनमधील तगडी स्टारकास्ट प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहेत. प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर हिनेही ‘धुरंधर’ चे कौतुक केले आहे. अंकिताने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओत ती म्हणाली, माझ्यावर विश्वास ठेवा… ‘धुरंधर’ पाहणं म्हणजे Worth Every Minute! चित्रपट पाहताना कुठेही कंटाळा येत नाही, कारण प्रत्येक मिनिट महत्त्वाचं आहे. मात्र त्यानंतर तिने ‘Day 1 As a Spy’ या ट्रेंडवर संताप व्यक्त केला आहे. 

अंकिता वालावलकर म्हणाली, स्पायवर मस्करी करून रील बनवणं म्हणजे विनोद नाही, तर अज्ञान आहे. त्यांचं आयुष्य कंटेंट नाही, तो रोजचा धोका आहे. थोड्या  views साठी देशासाठी आयुष्य पणाला लावणाऱ्यांची थट्टा करणं हे बुद्धिमत्तेचं लक्षण नाही, तर संवेदनशून्यपणाचं प्रदर्शन आहे. या ट्रेंडमध्ये काही इन्फ्लुएन्सर्स स्वतः ला पाकिस्तानात मिशनवर गेलेले सीक्रेट एजंट दाखवतात आणि दैनंदिन सवयींमुळे पकडले जातात, असं विनोदी पद्धतीने सादर केलं जातं. गुरुवारी बिर्याणी नाकारणं, कुणाला पाय लागल्यावर पाया पडणं किंवा गायीला नमस्कार करणं अशा सवयी दाखवत रील्स बनवल्या जात आहेत. यावरूनच अंकिताने अशा रील्स करणाऱ्यांना चांगलंच झापलं आहे.

https://www.instagram.com/reel/DSUP3UpDJ3-/?utm_source=ig_web_copy_link

अंकिता पुढे म्हणाली, आज हेच क्रिएटर्स २६ जानेवारी किंवा १५ ऑगस्टलाही देशसेवेवर रील्स बनवतील. पण हे समजून घ्या की स्पाय लोकांना फेम किंवा क्रेडिट मिळत नाही. त्यांची नावं कुठेही झळकत नाहीत. थोडंसं वाचन करा, विचार करा आणि फक्त ट्रेंड म्हणून अशा रील्स बनवणं थांबवा. ‘धुरंधर’ च्या यशासोबत सुरू झालेल्या या वादामुळे सध्या सोशल मीडियावर चित्रपटाइतकीच चर्चा या ट्रेंडचीही रंगताना दिसत आहे.