नियमानुसार काम होत नसेल तर राजीनामा द्या'; तुकाराम मुंढेंचा FDAच्या 29 अधिकारी-कर्मचाऱ्यांना स्पष्ट इशारा

नियमानुसार काम होत नसेल तर राजीनामा द्या'; तुकाराम मुंढेंचा FDAच्या 29 अधिकारी-कर्मचाऱ्यांना स्पष्ट इशारा

मुंबई (प्रतिनिधी) : अन्न आणि औषध प्रशासन (FDA) आयुक्त तथा आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी त्यांच्या कार्यपद्धतीविरोधात तक्रार करणाऱ्या 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे. ज्यांना शासनाच्या नियमांनुसार काम करायचे नसेल त्यांनी राजीनामा देऊन घरी जावे, असे त्यांनी म्हटले. त्यामुळे FDAमधील कामकाजाच्या पद्धतीवरून सुरू झालेला वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील राज्य अन्न आणि औषध प्रशासनाच्या प्रयोगशाळेतील 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीबाबत खात्याचे मंत्री नरहरी झिरवळ यांच्याकडे तक्रार केली आहे. 15 जुलै रोजी दिलेल्या निवेदनात दोन शिफ्टमध्ये काम करण्याचा निर्णय, शनिवार-रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कामाचे आदेश, रिक्त पदांमुळे वाढलेला कामाचा ताण तसेच त्यामुळे नमुन्यांच्या तपासणीच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. या निवेदनावर संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सह्याही आहेत.

या तक्रारीनंतर तुकाराम मुंढे यांनी आपली भूमिका स्पष्ट करत कर्मचाऱ्यांच्या आक्षेपांना उत्तर दिले. ते म्हणाले, छत्रपती संभाजीनगरमधील कर्मचाऱ्यांनी माझ्याविरोधात तक्रार केली की त्यांना सुट्टी मिळत नाही आणि जास्त तास काम करावे लागते. त्यांची पहिली मागणी म्हणजे इतर कार्यालयांप्रमाणे सकाळी 10 ते संध्याकाळी 6 अशी वेळ लागू करावी. मात्र, लॅब हे सामान्य कार्यालय नसून 24 तास सेवा देणारी व्यवस्था आहे.

मुंढे यांनी पुढे सांगितले की, कर्मचाऱ्यांकडून दिवसाला फक्त एकच 8 तासांची शिफ्ट घेतली जाते. आठवड्यात 48 तासांपेक्षा अधिक काम दिले जात नाही आणि ILOच्या नियमांचेही पालन केले जाते. तसेच आठवड्यात एक दिवस सुट्टीही दिली जाते. सध्या दोन शिफ्टमध्ये सहा दिवस काम सुरू असून, गरज पडल्यास भविष्यात लॅब 24 तास सुरू ठेवावी लागू शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ते पुढे म्हणाले, खासगी आणि सरकारी दोन्ही लॅब 24 तास सुरू असतात. त्यामुळे सकाळी 10 ते संध्याकाळी 6 अशी कार्यालयीन वेळ येथे लागू होऊ शकत नाही. कर्मचाऱ्यांचा काही गैरसमज असेल तर तो दूर करण्याचा प्रयत्न करू. मात्र, शासनाच्या नियमांनुसार काम करायचे नसेल तर त्यांनी राजीनामा देऊन जावे. ते त्यासाठी पूर्णपणे मोकळे आहेत.

दरम्यान, या प्रकरणानंतर सोशल मीडियावरही विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काही नेटकऱ्यांच्या मते, अनेक विभागांमध्ये वर्षानुवर्षे सोयीच्या पद्धतीने काम करण्याची संस्कृती तयार झाली आहे. तर काहींचे म्हणणे आहे की, तुकाराम मुंढे यांनी शिस्तबद्ध कामकाजावर भर दिल्यामुळेच त्यांच्या कार्यपद्धतीविरोधात तक्रारी करण्यात आल्या. मात्र, या दाव्यांना अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.