पुणेकरांसाठी मोठी अपडेट! 'MH 12 ZZ' नंतर गाड्यांवर कोणती सिरीज? मोहोळ-गडकरी भेटीनंतर मोठी माहिती

पुणेकरांसाठी मोठी अपडेट! 'MH 12 ZZ' नंतर गाड्यांवर कोणती सिरीज? मोहोळ-गडकरी भेटीनंतर मोठी माहिती

पुणे (प्रतिनिधी) : पुणे शहराची ओळख बनलेला 'MH 12' हा आरटीओ कोड यापुढेही कायम राहण्याची शक्यता वाढली आहे. सध्या पुण्यात वाहन नोंदणीसाठी 'MH 12 ZZ' ही शेवटची मालिका सुरू असून, ती संपल्यानंतर पुढे कोणती सिरीज सुरू होणार याबाबत चर्चा सुरू होती. या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री तथा पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन या विषयावर सकारात्मक तोडगा काढल्याची माहिती समोर आली आहे.

पुण्यात वाहनांची संख्या सातत्याने वाढत असल्यामुळे 'MH 12 ZZ' नंतर पुणे आरटीओला 'MH 61' ही नवीन सिरीज दिली जाऊ शकते, अशी चर्चा होती. मात्र, 'MH 12' हा कोड केवळ वाहन नोंदणीपुरता मर्यादित नसून तो पुण्याची ओळख बनला आहे. त्यामुळे ही ओळख कायम ठेवावी, अशी पुणेकरांची मागणी होती.

याच पार्श्वभूमीवर मुरलीधर मोहोळ यांनी नवी दिल्लीत नितीन गडकरी यांची भेट घेतली. पुण्याचा 'MH 12' हा कोड कायम ठेवण्यासाठी देशात प्रथमच 'एक अंक आणि एक अक्षर', म्हणजेच 'MH 12 1A' अशा स्वरूपाची नवीन मालिका सुरू करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला.

या प्रस्तावाला नितीन गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे सांगितले जात आहे. 'MH 12' ही पुण्याची ओळख कायम ठेवण्यासाठी आवश्यक त्या सूचना दिल्या जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. त्यामुळे येत्या काळात पुण्यातील नव्या वाहनांवर 'MH 12 1A' ही सिरीज पाहायला मिळण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.