नीट पुनर्परीक्षेची तारीख जाहीर; NTA ची घोषणा, शिक्षणमंत्र्यांकडून नवे नियम लागू

नीट पुनर्परीक्षेची तारीख जाहीर; NTA ची घोषणा, शिक्षणमंत्र्यांकडून नवे नियम लागू

मुंबई (वृत्तसंस्था) : दोन दिवसांपूर्वी मोदी सरकारच्या निर्देशांनुसार NTA नं रद्द केलेली NEET ची पुनर्परीक्षा होणार आहे. परीक्षा रद्द करताना यासंदर्भात एनटीएनं माहिती दिली होती. रद्द झालेली परीक्षा नेमकी कधी होणार? याबाबत परीक्षार्थींमध्ये मोठा संभ्रम होता. आता एनटीएनं नीट पुनर्परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. त्यानुसार, येत्या २१ जून रोजी रविवारी नीटची पुनर्परीक्षा पार पडणार आहे. परीक्षेची तारीख जाहीर झाल्यामुळे आता विद्यार्थ्यांना त्यादृष्टीने अभ्यास व इतर नियोजन करणं शक्य होणार आहे. यानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत विद्यार्थ्यांसाठी पुनर्परीक्षेदरम्यान देण्यात येणाऱ्या नव्या सुविधांची माहिती दिली.

नीट परीक्षेचे पेपर आधीच फुटले होते, अशी बाब गेल्या आठवड्यात उघड झाली. त्या पार्श्वभूमीवर व्हॉट्सअॅप ग्रुप्सवर काही क्लासचालक व प्रशिक्षण केंद्रचालकांनीच हे पेपर मुलांना हजारो रुपयांना विकल्याचाही धक्कादायक प्रकार समोर आला. या पार्श्वभूमीवर देशभरातील विद्यार्थ्यांना याचा भुर्दंड सोसावा लागणार असून नीट परीक्षेच्या फेऱ्यातून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा अभ्यास करून ही परीक्षा द्यावी लागणार आहे.

३ मे रोजी देशभरातील २२ लाखांहून जास्त विद्यार्थ्यांनी NEET परीक्षा दिली होती. परीक्षा झाल्यानंतर सर्व विद्यार्थी पुढील नियोजनात व्यग्र झाले. त्यांच्या कुटुंबीयांनीदेखील साहजिकच सुटकेचा निश्वास टाकला. पण काही दिवसांतच या परीक्षेसाठीचे पेपर आधीच फुटले होते, अशी बाब समोर आली. त्यापाठोपाठ वेगवेगळ्या ठिकाणांहून हे पेपर लीक झाले होते हेही समोर आलं. प्रशिक्षण केंद्राच्या नावाखाली चालवल्या जाणाऱ्या सेंटर्सवरून हे पेपर्स लीक करण्यात आल्याचं पोलीस तपासात समोर आलं. त्यानुसार, पोलिसांनी देशभरात जागोजागी धाडी टाकून आत्तापर्यंत ६ जणांना अटक केली आहे.

दरम्यान, NEET ची पुनर्परीक्षा २१ जूनला होणार असल्याचं जरी एनटीएनं आज जाहीर केलं असलं, तरी या पुनर्परीक्षेची नियमावली मात्र परीक्षा रद्द केली त्याच दिवशी एनटीएकडून जाहीर करण्यात आली होती.