नेहरूंनी आणलेल्या आधुनिक शिक्षण पद्धतीचे मोदी सरकारने केले वाटोळे, राऊतांचा जोरदार हल्लाबोल

नेहरूंनी आणलेल्या आधुनिक शिक्षण पद्धतीचे मोदी सरकारने केले वाटोळे, राऊतांचा जोरदार हल्लाबोल

नवी दिल्ली : कॉक्रोच जनता पार्टीच्या दिल्लीतील आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय शिक्षणमंत्रीपदाचा राजीनामा दिला. यानंतर, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला. यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. “प्रल्हाद जोशी यांचा शिक्षणाशी काय संबंध?” असे म्हणत हल्लाबोल केला. तसेचकिती मंत्र्यांची मुले विदेशात शिकत आहेत, हे जाहीर कराअसे म्हणत निशाणा साधला.



पत्रकारांशी संवाद साधताना शिवसेना उबाठा खासदार संजय राऊत म्हणाले की, “पेपर फोडणाऱ्यांना आधी 1 वर्षाची शिक्षा आणि एक कोटी दंड होता, आता फक्त आकडे बदलून 10 वर्षांची शिक्षा आणि 10 कोटी दंड करण्यात आला आहे. हे सरकार स्वतः कायद्यांचे किती पालन करते?” असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. “देशात पक्षांतर बंदी कायदा असताना मोदी, अमित शहा, एकनाथ शिंदे यांच्यासारखे नेते आणि लोकसभा, विधानसभा, राज्यसभेचे अध्यक्ष या कायद्याचे खरोखर पालन करतात का? कायदा हा केवळ एक देखावा बनला आहे,” अशी टीका त्यांनी यावेळी केली.

शिवसेना उबाठा खासदार संजय राऊत म्हणाले की, “पंडित नेहरूंनी आधुनिक शिक्षण पद्धती आणली. गेल्या दहा वर्षात आधुनिक शिक्षण पद्धतीचे वाटोळे केले. मोदी सरकारने पुराण आणि महाभारत काळातील शिक्षण पद्धती आणली, त्याबद्दल तुम्ही माफी मागितली पाहिजे,” अशी मागणी त्यांनी यावेळी केली. “पंडित नेहरू, इंदिरा गांधी यांच्यापासून मनमोहन सिंग यांच्यापर्यंत देशात तंत्रज्ञान आले. आयआयटी, आयआयएम अशा संस्थांची स्थापना झाली. पण, तुम्ही काय केलं. फक्त गोशाळा बांधल्या? तुम्ही मुलांना पकोडे तळायला सांगता, तुम्ही शेण गोळा करायला सांगता. गोमूत्र गोळा करायला सांगता.” असे म्हणत त्यांनी टीका केली. “नरसिंहराव यांनी मनमोहन सिंग यांना अर्थमंत्री नेमले होते. पण, इकडे संघाचे शिक्षणमंत्री करण्याऐवजी निलेकणी यांना शिक्षणमंत्री करा.” असे म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचाही पुनरुच्चार केला.

खासदार संजय राऊत यावेळी म्हणाले की, “देशातील सर्व विद्यापीठांचे कुलगुरू हे सरकारने नव्हे तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नेमले आहेत. अशा कुलगुरूंमुळे शिक्षणाचा दर्जा कसा उंचावणार? भाजपच्या कोणत्या नेत्यांची मुले परदेशात शिकत आहेत आणि तिथे उद्योग करत आहेत, हे मोदी सरकारने आधी जाहीर करावे. सर्व मंत्र्यांची आणि नेत्यांची मुले परदेशात उच्च शिक्षण घेत आहेत आणि गरिबांच्या मुलांना मात्र इथल्या बोगस शिक्षण पद्धतीत अडकवून ठेवले जात आहे,” असे म्हणत त्यांनी खंत व्यक्त केली.