पंढरपूर वारीत शरद आयुर्वेद मेडिकल कॉलेजची मोफत वैद्यकीय सेवा
यड्राव (प्रतिनिधी) : यड्राव येथील शरद आयुर्वेद मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर यांच्या वतीने आषाढी पंढरपूर वारीनिमित्त सातारा जिल्ह्यातील तारडगाव (ता. फलटण) येथे मोफत वैद्यकीय सेवा शिबिर व जनजागृती अभियान राबविण्यात आले. या शिबिरामध्ये वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना आवश्यक औषधोपचार व आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले.

या वैद्यकीय सेवा उपक्रमात डॉ. अमित मासुले, डॉ. नेहा बागवे यांच्यासह महाविद्यालयातील वैद्यकीय अधिकारी व विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. वारकऱ्यांची रक्तदाब, ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी, पायांचे विकार, थकवा आदी तक्रारींची तपासणी करून आवश्यक औषधांचे मोफत वितरण करण्यात आले. तसेच वारीदरम्यान आरोग्याची काळजी कशी घ्यावी, पुरेसे पाणी पिणे, स्वच्छता आणि संतुलित आहार याबाबत जनजागृती करण्यात आली.
'शरद पॅटर्न' हा केवळ गुणवत्तापूर्ण शिक्षणापुरता मर्यादित नसून समाजाप्रती असलेली बांधिलकी जपणारा उपक्रम आहे, याची प्रचिती या वैद्यकीय सेवा शिबिरातून पुन्हा एकदा आली. विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष समाजात जाऊन आरोग्यसेवा देत सेवा, संवेदनशीलता आणि सामाजिक उत्तरदायित्वाचे दर्शन घडविले. वारकऱ्यांनीही या सेवेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत महाविद्यालयाच्या कार्याचे कौतुक केले.या उपक्रमासाठी संस्थेचे चेअरमन आमदार डॉ. राजेंद्र पाटील (यड्रावकर) व एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांचे मार्गदर्शन लाभले.




