पुन्हा एकदा साडे माडे तीन या चित्रपटाची रिलीज डेट बदलली ; नेमकं कारण काय..?
मुंबई - पुन्हा एकदा साडे माडे तीन हा बहुप्रतीक्षीत चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट ३० जानेवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार होता. मात्र, आता चित्रपट प्रदर्शनाची नवीन तारीख जाहिर झाली आहे. त्यामुळे प्रेक्षकांना कुरळे बंधूंना भेटण्यासाठी काही काळ वाट पहावी लागणार आहे. अमेय विनोद खोपकर पिक्चर्सचे अमेय खोपकर म्हणतात, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली जाण्याने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली. हा आघात अत्यंत वेदनादायी असून, या दुःखात आम्हीही सहभागी आहोत. अशा काळात कोणत्याही प्रकारचा आनंदोत्सव साजरा करणे आम्हाला योग्य वाटले नाही. त्यामुळे संवेदनशीलतेची जाणीव ठेवत आम्ही ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ च्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. तसेच इतर चित्रपटांच्या प्रदर्शनावर कोणताही परिणाम होऊ नये, याचीही काळजी घेत आम्ही हा चित्रपट १३ फेब्रुवारी रोजी सर्वत्र प्रदर्शित करत आहोत. संवेदनशीलतेला प्राधान्य देत घेतलेला हा निर्णय प्रेक्षकांकडूनही समजून घेतला जाईल, असंही ते म्हणाले.

पुन्हा एकदा साडे माडे तीन या चित्रपटात कुरळे बंधूंची धमाल आणि गोंधळ प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. या चित्रपटात रतन, मदन, चंदन आणि बबन या वेगवेगळ्या स्वभावांच्या चार जणांची भन्नाट अशी मनोरंजनाची मेजवाणीच प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. या चार जणांच्या आयुष्यात घडत असणारे गोंधळ, गैरसमज आणि आलेल्या अनपेक्षित वळणांची धमाल या चित्रपटातून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. सतत बिघडत जाणारी परिस्थिती, छोट्या गोष्टींमधून मोठा गोंधळ आणि त्यातून निर्माण होणारा विनोद हा या चित्रपटाचा केंद्रबिंदू आहे. या गोंधळात रिंकू राजगुरूची एन्ट्री त्यांच्या आयुष्यात वेगळच वळण घेऊन येणार असून ती या चौघांच्या आयुष्यात का आली असावी आणि तिच्या येण्यामुळे सगळ्यांची गडबड का उडाली याची उत्तरं प्रेक्षकांना चित्रपट पाहूनच मिळणार आहेत. या सगळ्यात बबनचा खोडकरपणा, मदनचा विनोदी अंदाज, चंदनची निरागसता आणि रतनचा ताठर स्वभाव प्रेक्षकांना पुन्हा एकदा भावणार असे चित्र दिसून येत आहे.
या चित्रपटात अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, आणि रिंकू राजगुरू यांची प्रमुख भूमिका असून संजय नार्वेकर यात पाहुणे कलाकार म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. सुशीलकुमार अग्रवाल आणि अल्ट्रा मीडिया ॲण्ड एंटरटेनमेंट प्रस्तुत, उषा काकडे प्रॉडक्शन्स, ईओडी. मीडिया उदाहरणार्थ निर्मित आणि अमेय विनोद खोपकर पिक्चर्स यांच्या सहकार्याने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अंकुश चौधरी यांनी केले आहे. तसेच उषा काकडे, पुष्कर यावलकर, सुधीर कोलते, स्वाती खोपकर आणि निनाद नंदकुमार बत्तीन हे निर्माते आहेत. मोहसिन खान, यशराज टिळेकर, सौरभ ललवाणी आणि धनविक एंटरटेनमेंट सहनिर्माते असून स्मिथ पीटर तेलगोटे सहायक निर्माता आहेत. चित्रपटाचे छायाचित्रण प्रसिद्ध छायाचित्रकार संजय जाधव यांनी केले आहे.




