पेलेट गनच्या आरोपावरून लोकसभेत खडाजंगी; राहुल गांधींच्या दाव्यावर रिजिजूंचा पलटवार

पेलेट गनच्या आरोपावरून लोकसभेत खडाजंगी; राहुल गांधींच्या दाव्यावर रिजिजूंचा पलटवार

मुंबई (प्रतिनिधी) : लोकसभेत सार्वजनिक परीक्षा (गैरप्रकारांना प्रतिबंध) सुधारणा विधेयक, 2026 वर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान आज जोरदार राजकीय खडाजंगी पाहायला मिळाली. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिल्लीतील जंतर-मंतरवरील विद्यार्थी आंदोलनाचा मुद्दा उपस्थित करत थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप केले.राहुल गांधी यांनी दावा केला की, आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्ज आणि पेलेट गनच्या वापराचे आदेश गृहमंत्रालयाकडून देण्यात आले होते. त्यांच्या या आरोपांनंतर सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार गदारोळ झाला.

यावेळी समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनीही विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या कारवाईवरून सरकारवर टीका केली. जे लोकांच्या श्रद्धेशी खेळू शकतात, ते तरुणांच्या भविष्याशीही खेळू शकतात, असा आरोप करत त्यांनी सरकारवर निशाणा साधला.यानंतर राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे समर्थन केले. ते म्हणाले की, सर्व राजकीय पक्षांनी, भाजपमधील नेत्यांनीही विद्यार्थ्यांच्या भावनांचा आदर केला पाहिजे. शिक्षणाच्या प्रश्नावर तरुणांना रस्त्यावर उतरावे लागणे ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी सांगितले.

राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात पुन्हा एकदा शिक्षण व्यवस्थेवरून केंद्र सरकारवर टीका केली. त्यांनी आरोप केला की, शिक्षण मंत्रालयाचा कारभार प्रत्यक्षात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून चालवला जात असल्याचा दावा करत, देशातील विद्यापीठांमधील नियुक्त्यांवरही प्रश्न उपस्थित केले.यावेळी राहुल गांधी यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधत, विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, बंदुका आणि पेलेट गन वापरण्याचे आदेश दिल्याचा आरोप केला. त्यांनी गृहमंत्र्यांच्या सुरक्षाताफ्यावरही भाष्य केले.

राहुल गांधींच्या या आरोपांना संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी आक्षेप घेतला. राहुल गांधी हे आरोप कोणत्या आधारावर करत आहेत? त्यांच्याकडे याचे पुरावे आहेत का? असा सवाल त्यांनी केला. तसेच, पुराव्याशिवाय असे गंभीर आरोप करणे चुकीचे असल्याचे सांगत त्यांनी राहुल गांधींनी माफी मागावी, अशी मागणी केली. तुम्ही एखाद्याची हत्या केली असं आम्ही म्हणू का? असा पलटवारही रिजिजू यांनी केला.

दरम्यान, काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांनीही सभागृहातील आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले. मी फक्त सत्य बोलले आहे. सत्य बोलल्याबद्दल शिक्षा द्यायची असेल तर द्या, पण मी सत्य बोलत राहीन, असे त्या म्हणाल्या.

प्रियांका गांधी यांनी शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशी यांच्यावरही टीका केली. मंगळुरूमधील एका पबमधील महिलांवरील हल्ल्याच्या प्रकरणाचा उल्लेख करत, या प्रकरणातील एका व्यक्तीला भाजपमध्ये प्रवेश दिल्याचा आरोप त्यांनी केला. काही तासांनी त्याला पक्षातून बाहेर काढण्यात आल्याचे सांगत, या घटनेतून महिलांबाबतची विचारसरणी दिसून येते, असा दावा त्यांनी केला.