शिक्षण मंत्रालय RSS चालवत होतं" राहुल गांधींचा लोकसभेत आरोप

शिक्षण मंत्रालय RSS चालवत होतं" राहुल गांधींचा लोकसभेत आरोप

मुंबई (प्रतिनिधी) : पेपरफुटीशी संबंधित 'सार्वजनिक परीक्षा (गैरप्रकारांना प्रतिबंध) सुधारणा विधेयक, 2026' वर लोकसभेत चर्चा सुरू असताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. शिक्षण व्यवस्था, विद्यापीठे आणि पेपरफुटीच्या मुद्द्यावरून त्यांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले.

राहुल गांधी म्हणाले की, धर्मेंद्र प्रधान यांनी कधीच शिक्षण मंत्रालय चालवलं नाही, ते फक्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) चालवलं. देशातील विद्यापीठांमधील कुलगुरूंच्या नियुक्त्यांवरही त्यांनी प्रश्न उपस्थित करत, अनेक ठिकाणी RSSशी संबंधित लोक असल्याचा आरोप केला. शिक्षण व्यवस्थेचा आत्माच ताब्यात घेतल्याचा दावाही त्यांनी केला.

राहुल गांधी यांनी सांगितले की, RSS ने केवळ शैक्षणिक संस्था ताब्यात घेतलेल्या नाहीत, तर संपूर्ण व्यवस्थेवर प्रभाव निर्माण केला आहे. तुमचा खरा विरोधक धर्मेंद्र प्रधान नाही, तर RSS आहे, असे म्हणत त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.

यावेळी राहुल गांधी यांनी दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा मुद्दाही उपस्थित केला. विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईवरून त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर आरोप केले. विद्यार्थ्यांवर पेलेट गन वापरण्याचे आदेश दिल्याचा दावा त्यांनी केला. या वक्तव्यानंतर संसदेत मोठा गदारोळ झाला.

राहुल गांधी यांच्या आरोपांवर संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी आक्षेप घेत पुरावे सादर करण्याची मागणी केली. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये झालेल्या जोरदार गोंधळामुळे काही काळासाठी लोकसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले.

दरम्यान, राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांच्या धैर्याचा उल्लेख केला. पालकांना सरकारविरोधात उभे राहण्यास अडचण वाटत असली तरी विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारण्याचे धाडस दाखवले, असे ते म्हणाले.

याआधी राहुल गांधी यांनी लोकसभेत 'मूर्ख' आणि 'अंधभक्त' या शब्दांवरून केलेल्या वक्तव्यामुळेही मोठा वाद निर्माण झाला होता. त्यांच्या या विधानावर भाजप खासदारांनी जोरदार आक्षेप घेतला होता. त्यामुळे पेपरफुटी विधेयकावरील चर्चा राजकीय आरोप-प्रत्यारोपांनी चांगलीच तापली.