बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीकरता सुनेत्रा पवारांचं नाव निश्चित?

बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीकरता सुनेत्रा पवारांचं नाव निश्चित?

मुंबई (प्रतिनिधी) : राज्याचे दिवगंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे बारामती विधानसभेची जागा रिक्त झाली आहे. या जागेवर आता लवकरच पोटनिवडणूक होणार असून त्याकरता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून सुनेत्रा पवारांच्या नाव निश्चित झाल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस कोअर कमिटीच्या बैठकीत सुनेत्रा पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं वृत्त प्रसिद्ध झालं आहे. मात्र ही निवडणूक बिनविरोध होणार? की शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवार दिला जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. याच मुद्द्यावर आज सुप्रिया सुळे यांनी महत्त्वाची माहिती दिली.

बारामती विधानसभा पोटनिवडणूक लवकरच जाहीर होणार असून त्याकरता निवडणूक आयोगाकडून तयारी सुरू आहे. तसंच, रिक्त झालेल्या जागेवर सुनेत्रा पवारांना संधी दिली जाणार आहे. तर, त्यांच्याविरोधात कोण उभं राहणार का? असा प्रश्न उपस्थित होतोय. यावर सुप्रिया सुळेंना आज विचारण्यात आलं. त्यावर त्या म्हणाल्या, “अर्थात ही निवडणूक बिनविरोध होईल. दादांनंतरची ही पोटनिवडणूक आहे. आपण इतके सुसंस्कृत आहोत. त्यामुळे नक्कीच ही निवडणूक बिनविरोध होईल.”

दरम्यान, पार्थ पवारांनाही राज्यसभेची संधी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. मात्र, पार्थ पवारांच्या उमेदवारीला सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी विरोध केला आहे. पार्थ पवारांचं महाराष्ट्रासाठी योगदान काय? असा प्रश्न त्यांनी विचारलाय. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, “ही लोकशाही आहे. प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. आपल्या संघटनेत काम करत असताना त्यांनी काय करावं हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे”, असं म्हणत पार्थ पवारांच्या राज्यसभेच्या उमेदवारीवर थेट बोलणं टाळलं.

दरम्यान, अजित पवारांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री पदी सुनेत्रा पवारांनी शपथ घेतली. तसंच, अजित पवारांकडे असलेल्या खात्यांपैकी काही खातीही सुनेत्रा पवारांकडे आली. तर, बीड आणि पुण्याचं पालकमंत्रीपदही सुनेत्रा पवारांकडे देण्यात आलं आहे. त्यामुळे आता, अजित पवार ज्या मतदारसंघातून आमदार होते, त्या मतदारसंघात म्हणजेच राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात सुनेत्रा पवारांना उमेदवारी देण्याबाबत शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा आहे. ही निवडणूक बिनविरोध झाली तर सुनेत्रा पवार या आमदार म्हणून निवडून येतील.