बीडमध्ये दुहेरी धडक कारवाई! बेकायदेशीर कला केंद्रावर छापा; 10 जण ताब्यात, तलाठी निलंबित

बीडमध्ये दुहेरी धडक कारवाई! बेकायदेशीर कला केंद्रावर छापा; 10 जण ताब्यात, तलाठी निलंबित

बीड (प्रतिनिधी) : पहिल्या घटनेत, बीड तालुक्यातील उदंड वडगाव येथे विनापरवाना सुरू असलेल्या 'जगदंबा कला केंद्रा'वर नेकनूर पोलीस आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या संयुक्त पथकाने अचानक छापा टाकला. या कारवाईत 8 महिला आणि 2 पुरुषांना ताब्यात घेण्यात आले असून, एक संशयित घटनास्थळावरून फरार झाला आहे.

पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. प्राथमिक चौकशीत हे कला केंद्र कोणत्याही कायदेशीर परवानगीशिवाय सुरू असल्याचे समोर आले. तसेच आरिफ आसिफ शेख आणि शफिक अली मोमीन हे संबंधित ठिकाण चालवत असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.

या प्रकरणी संबंधितांविरुद्ध नेकनूर पोलीस ठाण्यात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, फरार आरोपीचा शोध सुरू आहे. तसेच या कला केंद्राच्या आडून इतर कोणतेही बेकायदेशीर प्रकार सुरू होते का, याचाही पोलीस तपास करत आहेत.दरम्यान, दुसऱ्या प्रकरणात माजलगाव येथील एका तलाठ्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी निलंबनाची कारवाई केली आहे.

रूपचंद आभारे या तलाठ्यांनी वादग्रस्त भूखंडावरील फेरफार स्वतःच्या पत्नी आणि नातेवाईकांच्या नावे मंजूर केल्याची तक्रार करण्यात आली होती. चौकशीत आरोपांमध्ये तथ्य आढळल्यानंतर जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी त्यांना शासकीय सेवेतून निलंबित केले आहे.तक्रारीनुसार, माजलगाव शहरालगतच्या गट क्रमांक 105 मधील न्यायप्रविष्ट जमिनीवर एकाच दिवशी तब्बल 12 फेरफार मंजूर करण्यात आले होते. यापैकी काही फेरफार पत्नीच्या, तर काही नातेवाईकांच्या नावे करण्यात आल्याचा आरोप आहे.

या दोन्ही कारवायांमुळे बीड जिल्ह्यात कायदा आणि प्रशासनाच्या कामकाजाबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. पुढील तपास सुरू असून, या प्रकरणांमध्ये आणखी कोणते खुलासे होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.