भोंदू खरात चित्रपटात एकनाथ शिंदे, सुषमा अंधारेसह अनेक नेत्यांच्या भूमिका; दीपाली सय्यद यांचे मोठे दावे
मुंबई (प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसांपासून 'महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स' या चित्रपटाची राज्यभर जोरदार चर्चा सुरू आहे. नाशिकमधील कथित भोंदू अशोक खरात प्रकरणावर आधारित असल्याचा दावा करण्यात आलेल्या या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून, त्यानंतर राजकीय वर्तुळातही चर्चा रंगली आहे.

चित्रपटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली चाकणकर यांच्यापासून प्रेरित पात्र साकारत असलेल्या अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी माध्यमांशी बोलताना अनेक दावे केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, या चित्रपटात विविध राजकीय नेत्यांपासून प्रेरित पात्रे दाखवण्यात आली असून, त्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यासह इतर काही व्यक्तींचीही पात्रे असल्याचे त्यांनी सांगितले.
दीपाली सय्यद यांनी असेही सांगितले की, रूपाली चाकणकर यांच्यापासून प्रेरित भूमिका स्वीकारल्यानंतर त्यांना काही धमकीचे फोन आले होते. त्यामुळे चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सुरक्षेची विशेष व्यवस्था करण्यात आली होती. नंतर असे फोन बंद झाले, मात्र त्या काळात मनात भीतीचे वातावरण असल्याचे त्यांनी नमूद केले.
चित्रपटाचा मुख्य उद्देश अंधश्रद्धा, भोंदूगिरी आणि त्याच्या आड होणाऱ्या कथित गैरप्रकारांबाबत जनजागृती करणे हा असल्याचेही दीपाली सय्यद यांनी स्पष्ट केले. त्यांच्या मते, अनेक लोक वैयक्तिक अडचणींमुळे अशा भोंदूंच्या जाळ्यात अडकतात आणि त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतात. हा चित्रपट अशाच वास्तवाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतो.
दरम्यान, अशोक खरात प्रकरण समोर आल्यानंतर अनेक राजकीय, प्रशासकीय आणि प्रतिष्ठित व्यक्तींची नावे चर्चेत आली होती. या प्रकरणात रूपाली चाकणकर आणि अशोक खरात यांच्यात कथित आर्थिक व्यवहार झाल्याचे आरोपही समोर आले होते. त्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा त्यांनी राजीनामा दिला होता. या सर्व घडामोडींनंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती.




