मनोज जरांगे यांना हात लावला तर पूर्ण महाराष्ट्र इथं येईल; अभिजीत दीपकेंचा सरकारला इशारा
मुंबई (प्रतिनिधी) : मराठा आरक्षणाच्या विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीमध्ये 29 ऑगस्टपासून उपोषण सुरू केलं आहे. त्यांच्या उपोषणाचा 14 वा दिवस आहे. याच पार्श्वभूमीवर कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली. मनोज जरांगे यांच्याशी सरकारनं चर्चा करावी. सोनम वांगचूक यांच्याबाबत जसं करण्यात आलं, तसं मनोज जरांगे यांच्यासोबत करू नये, असं दीपके यांनी म्हटलं.

मनोज जरांगे यांच्या उपोषणाला 14 दिवस झाले, मात्र सरकारनं अद्याप त्यांची विचारपूस केलेली नाही, अशी टीका त्यांनी केली. चांगलं शिक्षण आणि रोजगार मिळावा यासाठी ते उपोषणाला बसले आहेत. सरकारनं या सुविधा दिल्या असत्या, तर त्यांना उपोषण करण्याची गरज पडली असती का?, असा सवाल त्यांनी केला. सरकारनं ग्रामीण भागात चांगलं शिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या नाहीत. सरकारच्या अपयशामुळेच मनोज जरांगे यांना हे पाऊल उचलावं लागलं, अशी टीकाही अभिजीत दीपके यांनी केली.
सोनम वांगचूक यांना दिल्ली पोलिसांनी उपोषणाच्या ठिकाणाहून उचललं होतं. तसंच काही करण्याचा प्रयत्न सरकारनं मनोज जरांगे यांच्यासोबत करू नये, असा इशारा त्यांनी दिला."हा महाराष्ट्र आहे, इथं हे अजिबात चालणार नाही. मनोज जरांगे यांना हात लावला तर पूर्ण महाराष्ट्र इथं येईल," असं अभिजीत दीपके यांनी म्हटलं.
सरकारनं इथे येऊन मनोज जरांगे यांच्या मागण्या ऐकाव्यात. "तुम्हाला लोकांनी निवडून दिलं आहे, हेलिकॉप्टरमधून फिरण्यासाठी नाही, तर लोकांची कामं करण्यासाठी," असं म्हणत अभिजीत दीपके यांनी सरकारवर निशाणा साधला.




