मराठी अभिनेत्याच्या एका पोस्टने उडाली खळबळ; थेट पोलिसांना व्हावं लागलं सक्रिय, अखेर सत्य समोर आल्यावर

मराठी अभिनेत्याच्या एका पोस्टने उडाली खळबळ; थेट पोलिसांना व्हावं लागलं सक्रिय, अखेर सत्य समोर आल्यावर

मुंबई (प्रतिनिधी) : मराठमोळ्या अभिनेत्यानं केलेल्या एका फेसबुक पोस्टमुळे संपूर्ण मनोरंजन सृष्टीत एकच खळबळ उडाली. या पोस्टमुळे चाहते आणि मुंबई पोलिसांच्या पायाखालची जमीनही सरकली. मराठीतील प्रसिद्ध अभिनेते विकास समुद्रे यांनी अचानक फेसबुकवर एक पोस्ट केल्यामुळे हा प्रकार घडला. अभिनेत्याने आत्महत्या करत असल्याची संशयास्पद पोस्ट केल्याने चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. ही माहिती वाऱ्यासारखी पसरताच चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आणि ती तातडीने पोलिसांपर्यंत पोहोचली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ पावले उचलत अभिनेत्याशी संपर्क साधला.

विकास समुद्रे यांनी फेसबुकवर थेट "I am committing Suicide.." अशा आशयाची पोस्ट शेअर केली होती. या धक्कादायक पोस्टमुळे पोलीस दलातही मोठी चलबिचल झाली. सायबर विभागाचे डीसीपी बजरंग बनसोडे यांनी तात्काळ पावलं उचलत मुंबई पोलिसांना सतर्क केले. पोलिसांनी त्वरित विकास समुद्रे यांच्याशी संपर्क साधला. मात्र, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केल्यानंतर समोर आलेली माहिती पूर्णपणे वेगळीच होती.

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकास समुद्रे यांच्याशी संपर्क साधल्यानंतर ही पोस्ट मोबाईलमध्ये टाईप करताना झालेल्या चुकीमुळे (टायपिंग मिस्टेक) पडल्याचे स्पष्ट झाले. सध्या हे अभिनेते पूर्णपणे सुखरुप आणि सुरक्षित आहेत. आत्महत्या करण्याची कोणतीही दुर्दैवी घटना घडलेली नसून, केवळ एका तांत्रिक चुकीमुळे हा गैरसमज पसरला होता.

ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांची प्रचंड तारांबळ उडाली. कमेंट सेक्शनमध्ये चाहत्यांनी काळजी व्यक्त करत त्यांना धीर देण्यास सुरुवात केली.

"अडचण असू शकते, पण हा मार्ग योग्य नाही, प्लीज असं काही करू नका..", अशी भावनिक कमेंट एका युजरने केली. तर "सर, काय झालं? काही प्रॉब्लेम असेल तर, आपण काहीतरी मार्ग काढू शकतो.. एवढ्या टोकाचं पाऊल उचलू नका..", असे म्हणत अनेकांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी एका पॉडकास्ट मुलाखतीत बोलताना विकास समुद्रे यांनी त्यांच्या आयुष्यातील अत्यंत संघर्षमय काळावर प्रकाश टाकला होता. काही वर्षांपूर्वी त्यांना ब्रेन हॅम्रेजचा झटका आला होता, त्या काळातील अत्यंत वेदनादायक आणि कटू आठवणी त्यांनी शेअर केल्या होत्या. अशी वाईट वेळ कोणावरही येऊ नये, असे सांगत त्यांनी तो काळ अत्यंत कठीण असल्याचे म्हटले होते.

विकास समुद्रे यांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर, त्यांनी आजवर अनेक लोकप्रिय नाटकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. मात्र, त्यांना खरी आणि घराघरांमध्ये ओळख 'नवरा माझा नवसाचा' या सुपरहिट चित्रपटामुळे मिळाली. त्यांनी आपल्या दर्जेदार विनोदी भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे.