मविआचा आणखी एक आमदार शिंदेंच्या संपर्कात ? राऊतांच्या आरोपांनंतर ठाकरे गटाची 'मातोश्री'वर तातडीची बैठक

मविआचा आणखी एक आमदार शिंदेंच्या संपर्कात ? राऊतांच्या आरोपांनंतर ठाकरे गटाची 'मातोश्री'वर तातडीची बैठक

मुंबई: महाविकास आघाडीतील (मविआ) आणखी एक आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचा खळबळजनक दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी रविवारी मुंबईतील पत्रकार परिषदेत केला. काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार धीरज लिंगाडे यांना शिंदे गटाकडून तब्बल २० कोटी रुपयांची ऑफर आणि आगामी निवडणुकीत पुन्हा आमदारकी देण्याचे आश्वासन देण्यात आल्याचे राऊत यांनी सांगितले.

संजय राऊत म्हणाले, "विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असतानाच या घडामोडी घडल्या आहेत. हा सर्व पापाचा आणि राम मंदिरातून लुटलेला पैसा असून, तो कोणालाही पचणार नाही. सत्ता आणि यंत्रणेचा गैरवापर करून आमदार फोडण्याचे राजकारण सुरू आहे." पंतप्रधान मोदी, अमित शाह किंवा शिंदे-फडणवीस हे कोणीही अजरामर नाहीत, असे म्हणत त्यांनी महायुतीवर जोरदार निशाणा साधला.

भाजपकडून राऊतांचे दावे फेटाळले
संजय राऊत यांच्या या दाव्यावर भाजप आमदार पंकज भोयर यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. एखाद्या लोकप्रतिनिधीबद्दल अशा प्रकारे वक्तव्य करणे पूर्णपणे अयोग्य असून, संजय राऊतांच्या अशाच विधानांमुळे त्यांचे स्वतःचे लोक पक्ष सोडून जात आहेत, अशी खोचक टीका भोयर यांनी केली.

'मातोश्री'वर आमदारांची तातडीची बैठक
एकीकडे आमदार फुटीच्या चर्चा आणि दुसरीकडे सचिन अहिर यांच्या पक्षबदलाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे कमालीचे सावध झाले आहेत. ठाकरे गटातील आणखी काही आमदार फुटू नयेत यासाठी उद्धव ठाकरेंनी पक्षातील सर्व आमदारांना तातडीचा आदेश धाडला आहे. मंगळवारी संध्याकाळी ७ वाजता 'मातोश्री' निवासस्थानी या बैठकीचे आयोजन करण्यात आले असून, या बैठकीकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.