महापौर रुपाराणी निकम यांच्या जनता दरबारात ३६ नागरिकांचे अर्ज दाखल
कोल्हापूर प्रतिनिधी - महानगरपालिकेच्या वतीने शहरातील नागरिकांच्या समस्या व अडचणी थेट जाणून घेऊन त्यांचे तातडीने निराकरण करण्यासाठी दर महिन्याच्या ५ तारखेला महापौर रुपाराणी निकम यांच्या अध्यक्षतेखाली ‘जनता दरबार’ आयोजित करण्यात येतो. या महिन्यात महापालिकेच्या विविध विकासकामांच्या लोकार्पण व भूमिपूजन कार्यक्रमामुळे जनता दरबार आज महापालिकेच्या छत्रपती ताराराणी सभागृहात आयोजित करण्यात आला. यावेळी ३६ नागरिकांनी विविध समस्या व मागण्यांबाबत अर्ज दाखल केले.

महापौर रुपाराणी निकम यांनी जनता दरबारात नागरिकांच्या समस्या व तक्रारी प्रत्यक्ष जाणून घेतल्या. नागरिकांनी मांडलेल्या प्रश्नांवर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेत प्राप्त तक्रारींचे तातडीने निराकरण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. नागरिकांच्या प्रश्नांबाबत आवश्यक ती कार्यवाही करून त्याचा पाठपुरावा करण्याचे निर्देशही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.
जनता दरबाराच्या प्रारंभी महापौर रुपाराणी निकम यांनी नागरिकांना आपल्या समस्या थोडक्यात व स्पष्टपणे मांडण्याच्या सूचना केल्या. यावेळी विविध विभागांशी संबंधित एकूण ३६ अर्ज प्राप्त झाले. यामध्ये सहाय्यक आयुक्त कार्यालय – १, नगररचना विभाग – १७, विभागीय कार्यालय क्र. १ – २, विभागीय कार्यालय क्र. २ – १, विभागीय कार्यालय क्र. ३ – १, विभागीय कार्यालय क्र. ४ – २, पाणीपुरवठा विभाग – २, उद्यान विभाग – १, इस्टेट विभाग – २, अतिक्रमण विभाग – ३, आरोग्याधिकारी विभाग – १, मुख्य आरोग्य निरीक्षक कार्यालय – १, अंतर्गत लेखापरीक्षण विभाग – १ आणि पेन्शन विभाग – १ अशा अर्जांचा समावेश आहे. नागरिकांना त्यांच्या समस्या मांडण्यासाठी थेट व्यासपीठ उपलब्ध करून देण्याबरोबरच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रश्नावर तत्काळ कार्यवाही करण्याचा प्रयत्न जनता दरबाराच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
यावेळी स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, शिल्पा दरेकर, गटनेता आदिल फरास, नगरसेवक स्वरूप कदम, उपआयुक्त परितोष कंकाळ, किरणकुमार धनवाडे, सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाणे, शहर अभियंता रमेश मस्कर, जल अभियंता हर्षजीत घाटगे, आरोग्याधिकारी डॉ. प्रकाश पावरा, नगरसचिव सुनील बिद्री, उपशहर अभियंता अरुणकुमार गवळी, निवास पोवार, मिलिंद जाधव, पर्यावरण अभियंता समीर व्याघ्रांबरे, सिस्टीम मॅनेजर यशपालसिंग रजपूत, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार, सहाय्यक अभियंता नारायण पुजारी, अतिक्रमण प्रमुख प्रफुल्ल कांबळे तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.




