योग्य आहार, व्यायाम आणि पुरेशी झोप हीच सुदृढ आरोग्याची त्रिसूत्री; डॉ. सत्यनारायण चावा यांचे प्रतिपादन
कोल्हापूर (कदमवाडी): "व्यायाम, योग्य आहार आणि पुरेशी झोप हीच आरोग्यमय दीर्घायुष्याची खरी त्रिसूत्री आहे. वाढते वय हा आजार नसून निसर्गाचा नियम आहे, त्यावर कोणतेही औषध नाही. त्यामुळे निरोगी आणि सुदृढ आरोग्यासाठी या त्रिसूत्रीचा अवलंब करणे गरजेचे आहे," असे प्रतिपादन ‘लॉरस लॅब’चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सत्यनारायण चावा यांनी केले.
डी वाय पाटील अभिमत विद्यापीठाच्या वतीने आयोजित ‘भारतीय आरोग्य यंत्रणेतील संधी आणि आव्हाने’ तसेच ‘हेल्दी एजिंग’ (सुदृढ वृद्धत्व) या विषयांवरील व्याख्यानात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांनी डॉ. चावा यांचे स्वागत केले. यावेळी व्यासपीठावर डी वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे प्र-कुलपती आमदार ऋतुराज संजय पाटील, अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, आणि कृषी व तंत्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ए. के. गुप्ता उपस्थित होते.

आरोग्य क्षेत्रातील आव्हाने आणि बदल
डॉ. चावा पुढे म्हणाले, "सध्या भारतात नागरिकांचे सरासरी आयुष्यमान वाढत आहे, तर दुसरीकडे जन्मदर घटत आहे. हे आरोग्य क्षेत्रापुढील मोठे आव्हान आहे. इतर देशांच्या तुलनेत आपल्याकडे डॉक्टर्स, नर्सेस आणि हॉस्पिटलमधील बेडची संख्या कमी आहे. २०४७ पर्यंत विकसित भारताचे स्वप्न साकार करायचे असेल, तर आरोग्य, शिक्षण आणि संशोधन या क्षेत्रांवर विशेष भर देणे गरजेचे आहे."
भविष्यात तंत्रज्ञानाचा वापर वाढणार
"हेल्थकेअर क्षेत्र वेगाने वाढत असून भारतात मेडिकल टुरिझमला मोठ्या संधी आहेत. भविष्यात आरोग्य क्षेत्रात वेअरेबल डिव्हाईसेस, ई-कन्सल्टन्सी यांसारखे मोठे बदल होतील. तंत्रज्ञानाच्या वापरामुळे मानवी जीवन अधिक सुलभ होणार असल्याने विद्यार्थ्यांनी हे नवे तंत्रज्ञान आत्मसात करावे," असे आवाहनही त्यांनी केले. 'हेल्थी एजिंग'वर बोलताना त्यांनी वयानुसार शरीरात होणाऱ्या बायोलॉजिकल बदलांची सविस्तर माहिती दिली.
या कार्यक्रमाला विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, परीक्षा नियंत्रक अभय जोशी, आयक्यूएसी डायरेक्टर डॉ. शिंपा शर्मा, मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. राजेश ख्यालप्पा, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैशाली गायकवाड यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख, प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




