राजर्षि शाहू गव्हर्नमेंट सर्व्हंट्स बँकेची १०९ वी वार्षिक सभा उत्साहात ; बँकेला २.७५ कोटींचा विक्रमी नफा
सभासदांना १० टक्के लाभांश जाहीर; सलग १६ वर्षे एनपीए शून्य टक्के; कर्जमर्यादा ४० लाखांपर्यंत वाढवली
कोल्हापूर (प्रतिनिधी): येथील शतकोत्तर वाटचाल करणाऱ्या राजर्षि शाहू गव्हर्नमेंट सर्व्हंट्स को-ऑपरेटिव्ह बँक लि., कोल्हापूर या बँकेची १०९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सभासदांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात व अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात प्रतिभानगर हौसिंग सोसायटी हॉल, सागरमाळ येथे उत्साहात संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष प्रा. रविंद्र पंदारे होते.

सभेच्या प्रारंभी बँकेचे उपाध्यक्ष विलासराव कुरणे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी रुपेश पाटोळे यांनी विषयांचे वाचन केले. अहवाल सालात निधन झालेल्या मान्यवरांना व देशरक्षणार्थ धारातीर्थी पडलेल्या वीरांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
अध्यक्षीय भाषणात बोलताना अध्यक्ष रविंद्र पंदारे म्हणाले, "बँकेने ११० व्या वर्षात पदार्पण केले असून सभासदांच्या विश्वासामुळेच बँकेची यशस्वी वाटचाल सुरू आहे. सध्या बँकेकडे २५५ कोटी रुपयांच्या ठेवी असून १७७ कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. बँकेचा एनपीए (NPA) सलग १६ वर्षे ०% (शून्य टक्के) राहिला आहे. रिझर्व्ह बँकेचे 'ग्रेड १' मानांकन व ऑडिट वर्ग 'अ' मिळवून बँक आर्थिकदृष्ट्या अत्यंत सशक्त बनली आहे."
बँकेने अहवाल सालात २ कोटी ७५ लाख रुपयांचा विक्रमी नफा मिळवला असून, सहकार विभागाच्या व आरबीआयच्या सर्व नियमांचे पालन करून सभासदांना १० टक्के लाभांश (डिव्हिडंड) देण्याची घोषणा करण्यात आली.
महत्त्वाचे निर्णय व नवीन सुविधा:
१००% व ५०% कर्जमाफी योजना:
सेवानिवृत्त (पेन्शनर) कर्जदार सभासदाचे निधन झाल्यास १००% कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, १३ एप्रिल २०२६ पासून 'राजर्षि शाहू कर्ज सुरक्षा योजना' सुरू केली असून त्याद्वारे मयत कर्जदारास ५०% कर्जमाफी दिली जाईल. भविष्यात ही कर्जमाफी १००% करण्याचा मानस आहे.
कर्जमर्यादा वाढवली:
सभासदांसाठी वितरीत करण्यात येणाऱ्या कर्जाची मर्यादा आता ४० लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे.
डिजिटल सेवा:
बँकेचे नवीन मोबाईल ॲप सुरू करण्यात आले असून लवकरच युपीआय (UPI) सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे.
पर्यावरणपूरक पाऊल:
खर्चात कपातीसाठी प्रधान कार्यालयात सोलर पॅनेल बसवण्यात आले असून सर्व शाखा स्वमालकीच्या जागेत सुरू करण्याचे नियोजन आहे.
विषयपत्रिकेवरील सर्व विषय चर्चा होऊन एकमताने मंजूर करण्यात आले. सभासदांच्या शंकांचे निरसन संचालकांनी केले. या प्रसंगी बँकेचे उपाध्यक्ष विलासराव कुरणे, संचालक शशिकांत तिवले, मधुकर पाटील, अतुल जाधव, रोहित बांदिवडेकर, रमेश घाटगे, सदानंद घाटगे, संजय खोत, अजित पाटील, संचालिका हेमा पाटील, मनुजा रेणके, अरविंद आयरे, किशोर पोवार, प्रकाश पाटील, तज्ज्ञ संचालक दीपक पाटील, गणपत भालकर, प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी रुपेश पाटोळे व कर्मचारी-सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपाध्यक्ष विलासराव कुरणे यांनी उपस्थितांचे आभार मानले.




