राज्यसभा जागेसाठी हालचाली तेजीत; नवनीत राणा, सुनेत्रा पवार, भुजबळ चर्चेत तर अमोल मिटकरींची अस्वस्थता
मुंबई (प्रतिनिधी) : भाजप नेत्या नवनीत राणा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे. सुनेत्रा पवार यांच्या खासदारकीच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसंदर्भात ही भेट झाल्याची चर्चा रंगली आहे. विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकरण पुणे मतदारसंघासाठी पक्षाबाहेरील विक्रम काकडे यांना उमेदवारी देण्यात आल्यानंतर आता भाजपमध्ये गेलेल्या नवनीत राणा यांना राज्यसभेवर पाठविण्याच्या हालचाली सुरू असल्याच्या चर्चेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक ज्येष्ठ नेत्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

राज्यसभेच्या या जागेसाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे इच्छुक मानले जात आहेत. मात्र नवनीत राणा यांच्या नावाची चर्चा सुरू झाल्यानंतर पक्षातील निर्णय प्रक्रियेवर खासदार पार्थ पवार यांच्या गटाचा प्रभाव वाढल्याची चर्चा उघडपणे होऊ लागली आहे. राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदावरून प्रफुल पटेल यांचे नाव वगळण्यात आल्यानंतर ते पक्षात फारसे सक्रिय दिसत नसल्याचे देखील बोलले जात आहे. तसेच सुनील तटकरे हे देखील नाराज असल्याची चर्चा असून पक्षातील असंतुष्ट नेत्यांची संख्या वाढत असल्याचे सांगितले जात आहे.
या राज्यसभा जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ८ जून आहे. त्यामुळे या जागेसाठी पक्षातील विविध नेत्यांनी लॉबिंग सुरू केले असून उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न वेगाने सुरू आहेत. अखेर पक्षश्रेष्ठी कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ घालतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
२०१९च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या नवनीत राणा यांनी २०२४ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर त्यांच्या राजकीय पुनर्वसनाबाबत चर्चा सुरू आहेत. यासाठी त्यांनी अलीकडे भाजपमधील काही वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधल्याचेही बोलले जाते. मात्र रिक्त राज्यसभा जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातील असल्याने त्यांच्याशी संपर्क साधण्याचा सल्ला देण्यात आल्याची माहिती आहे. त्यानंतरच त्यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेतल्याचे समजते.




