'रामायण: पार्ट 1'चा ट्रेलर रिलीजपूर्वीच लीक; मेकर्स अॅक्शन मोडमध्ये, कलाकारांचे लूक चर्चेत

'रामायण: पार्ट 1'चा ट्रेलर रिलीजपूर्वीच लीक; मेकर्स अॅक्शन मोडमध्ये, कलाकारांचे लूक चर्चेत

मुंबई (प्रतिनिधी) : रणबीर कपूर स्टारर 'रामायण: पार्ट 1' या बहुप्रतिक्षित चित्रपटाची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत असतानाच, अधिकृत प्रदर्शनापूर्वीच ट्रेलर सोशल मीडियावर लीक झाल्याची माहिती समोर आली आहे. या लीकनंतर चित्रपटाच्या निर्मात्यांनी तातडीने अँटी-पायरसी मोहीम सुरू केली आहे.

दिल्लीतील 'प्रथम संकल्प' या विशेष कार्यक्रमात उपस्थित पाहुण्यांसाठी 1 मिनिट 28 सेकंदांचा खास प्रिव्ह्यू दाखवण्यात आला होता. मात्र, त्यातील काही दृश्ये मोबाईलवर रेकॉर्ड करून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आली.व्हायरल क्लिपमध्ये रणबीर कपूर भगवान राम यांच्या भूमिकेत दमदार एन्ट्री करताना दिसत आहेत. तर दुसऱ्या एका क्लिपमध्ये यश रावणाच्या भूमिकेतील त्यांचा लूकही पाहायला मिळत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर या चित्रपटाची चर्चा आणखी रंगली आहे.

निर्माते नमित मल्होत्रा आणि दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या टीमने अनधिकृत व्हिडिओ हटवण्यासाठी लीगल टीम आणि अँटी-पायरसी पार्टनर्सना कामाला लावले आहे. तसेच प्रेक्षकांनी लीक झालेल्या क्लिप्स पाहू किंवा शेअर करू नयेत, असे आवाहनही करण्यात आले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, 'रामायण: पार्ट 1' चा अधिकृत ट्रेलर 24 जुलै रोजी प्रदर्शित होणार असून, चित्रपट 8 नोव्हेंबर 2026 रोजी जगभरातील सिनेमागृहांत रिलीज होणार आहे.