राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमावर फडणवीसांचा दावा; ‘काँग्रेस नेत्यांच्या कॉलेजमधील मुलींचेच रजिस्ट्रेशन’

राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमावर फडणवीसांचा दावा; ‘काँग्रेस नेत्यांच्या कॉलेजमधील मुलींचेच रजिस्ट्रेशन’

मुंबई (प्रतिनिधी) : राहुल गांधी यांच्या पुण्यातील कार्यक्रमासाठी काँग्रेस नेत्यांच्या महाविद्यालयांमधील मुलींनाच आणण्यात येणार असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.‘छात्रो की गुंज’ हा खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठीचा कार्यक्रम आहे की राहुल गांधी राजकारणात आपले स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. ते गुरुवारी नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

राहुल गांधी यांनी कार्यक्रम खुला ठेवून सर्वसामान्य तरुणांशी संवाद साधला असता, तर अधिक आनंद झाला असता, असे फडणवीस म्हणाले. “माझ्याकडे जी माहिती आहे, त्यानुसार काँग्रेस नेत्यांकडून चालवल्या जाणाऱ्या महाविद्यालयांतील मुलींचेच रजिस्ट्रेशन करून त्यांना कार्यक्रमासाठी आणण्याच्या सूचना आहेत. पण त्या देखील आपल्याच मुली आहेत, त्यांच्याशी संवाद झाला तरी आनंद आहे,” असे फडणवीस यांनी म्हटले.

यावेळी फडणवीस यांनी ‘वंदे मातरम’ या राष्ट्रीय गीताबाबत काँग्रेसने मंजूर केलेल्या ठरावावरूनही काँग्रेसवर टीका केली. स्वतंत्र भारताच्या संसदेने घेतलेला निर्णय मान्य न करण्याची भूमिका काँग्रेस घेत असल्याचा आरोप त्यांनी केला.“भारत आता स्वतंत्र आहे. स्वतंत्र भारताच्या संसदेने घेतलेला निर्णय हा संवैधानिक असतो. तो निर्णय आम्ही मान्य करणार नाही, अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे. यातून गुलामीची परंपरा कायम ठेवण्याचे त्यांचे धोरण दिसून येते,” असे फडणवीस म्हणाले.

लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर लाभार्थ्यांची काही महिन्यांतच तपासणी करणे शक्य नव्हते. त्यानंतर सरकारने पडताळणी प्रक्रिया सुरू केली आणि ई-केवायसी हा त्यातील महत्त्वाचा भाग असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.त्यांच्या माहितीनुसार, 1 कोटी 65 लाख महिलांनी ई-केवायसी पूर्ण केली असून त्या पात्र ठरल्या आहेत. काही महिलांनी ई-केवायसी केलेले नाही. तसेच ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्य आयकर भरतात, त्यांना या योजनेच्या निकषांनुसार लाभ घेता येत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

लाडकी बहीण योजनेचा लाभ नियमबाह्य पद्धतीने घेतलेल्या पुरुष लाभार्थ्यांवर कारवाई करून पैसे वसूल केले जात असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. काही सरकारी कर्मचाऱ्यांनीही योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले असून, त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.“आता आलेला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचा आकडा 100 टक्के व्हेरिफाईड आहे. पात्र महिलांना आमचं सरकार असेपर्यंत योजनेचे पैसे मिळत राहतील,” असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.