रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक?; पुण्यातील कार्यक्रमावरून विखे पाटलांची राहुल गांधींवर बोचरी टीका
पुणे (प्रतिनिधी) : दिल्लीतील जंतरमंतरवर झालेल्या नीट आंदोलनानंतर राहुल गांधी चांगलेच आक्रमक झाले असून, ते झेन-जी तरुणाईशी सातत्याने संवाद साधत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज पुण्यात त्यांचा ‘छात्रों की गुंज’ हा कार्यक्रम होत आहे. मात्र, या कार्यक्रमावरून विरोधकांकडून राहुल गांधींवर टीका केली जात आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही राहुल गांधींवर टीका करत रोहित पवारांना टोला लगावला.

‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमावर बोलताना विखे पाटील म्हणाले की, राहुल गांधी यांनी सीजेपीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर असे उपक्रम हाती घेऊन स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्याचं काम सुरू केलं आहे. मात्र, विद्यार्थ्यांना राहुल गांधी काय आहेत हे माहिती आहे, त्यामुळे त्यांचं कोणीही ऐकायला तयार नाही, अशी टीका त्यांनी केली.
लोकसभेत सलग तीन वेळा पराभव झाल्याने आणि जनतेमध्ये त्यांची प्रतिमा खराब झाल्यामुळेच राहुल गांधी या आंदोलनाचा उपयोग करून घेत आहेत, असं विखे पाटील यांनी म्हटलं. “मागे जेव्हा सरकार आलं होतं, त्यावेळी हे लोक झोपले होते का? आत्ताच यांना अशा गोष्टी का सुचतात?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
राहुल गांधींच्या ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमासाठी पैसे देऊन लोक आणले जात असल्याचा आरोपही होत आहे. यावर प्रतिक्रिया देताना विखे पाटील म्हणाले की, राहुल गांधी आपल्या राजकीय फायद्यासाठी विद्यार्थी आंदोलनाचा वापर करत आहेत. पैसे देऊन विद्यार्थ्यांना बोलावण्यात आल्याची चर्चा सुरू आहे, ती गंभीर बाब आहे. राहुल गांधी विद्यार्थ्यांच्या अशा आंदोलनात कितीही सहभागी झाले तरी विद्यार्थ्यांनाही राहुल गांधी काय आहेत हे माहिती आहे, त्यांचं कुणी ऐकायला तयार नाही, असं ते म्हणाले.
दरम्यान, विद्यार्थ्यांना पैसे देऊन जमवल्याचा आरोप झाल्यानंतर काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी भाजप राहुल गांधींना घाबरत असल्याचं म्हटलं होतं. त्यावर विखे पाटील म्हणाले की, वास्तव जनतेसमोर मांडणं हे सर्वांचं काम आहे. कोणी विद्यार्थ्यांच्या आडून नौटंकी करत असेल तर खरं देखील जनतेसमोर आलं पाहिजे.‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमासाठी आमदार रोहित पवार यांनी राहुल गांधींच्या स्वागताचे बॅनर लावल्याबाबत विचारलं असता, “रोहित पवारांना फक्त एवढंच काम शिल्लक राहिलं आहे,” असा खोचक टोला विखे पाटलांनी लगावला.
नीट परीक्षेबाबत निर्माण होणाऱ्या प्रश्नांवरही विखे पाटील यांनी भाष्य केलं. याबाबत आपण स्वतः केंद्र शासनाकडे वेगळा प्रस्ताव देणार असून, अशा परीक्षा राज्य सरकारनेच घ्याव्यात, अशी मागणी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. परीक्षा राज्य सरकारने घेतल्यास शासकीय महाविद्यालये आणि अनुदानित विद्यालयांची जबाबदारीही वाढेल. तसेच कोचिंग क्लासेसच्या नावाखाली सुरू असलेली लूट थांबेल, असंही त्यांनी म्हटलं.
दरम्यान, अहिल्यानगर येथील पत्रकार सुशील थोरात यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी निषेध केला. दोन दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरून दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने थोरात यांच्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यात जखमी झालेल्या थोरात यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून, विखे पाटील यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली.
गुंडांचे धाडस एवढं वाढणं आश्चर्यकारक असल्याचं विखे पाटील यांनी म्हटलं. सुदैवाने थोरात यांना फार मोठी दुखापत झाली नसली तरी हा प्राणघातक हल्ला असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.आरोपींची माहिती असताना त्यांना तातडीने अटक होणे अपेक्षित होतं. मात्र, आरोपींना फरार होण्यासाठी पोलिसांकडून काही मदत झाली का, असा संशयही त्यांनी व्यक्त केला. तसेच आरोपींवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा इशाराही विखे पाटलांनी दिला.




