वाढत्या ठेवी ग्राहकांच्या विश्वासाचे प्रतीक : अध्यक्षा नवोदिता घाटगे
कागल (प्रतिनिधी) : राजे बँकेच्या गत आर्थिक वर्षात चाळीस कोटीहून अधिक रकमेच्या ठेवी वाढल्या आहेत. बँकेकडे सातत्याने वाढत असलेल्या ठेवी ह्या बँकेवरील सभासद व ग्राहकांच्या विश्वासाचे प्रतीक आहे, असे प्रतिपादन बँकेच्या अध्यक्षा नवोदिता घाटगे यांनी केले.येथील श्रीराम मंदिरमधील सभागृहात शतक महोत्सवी राजे विक्रमसिंह घाटगे बँकेची १०९वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न झाली. यावेळी अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या.

घाटगे पुढे म्हणाल्या, राजे बँक लवकरच एक हजार कोटी व्यवसायाचा टप्पा पार करण्याचे दिशेने वाटचाल करीत आहे. बाजारात अस्थिरता असूनही बँकेस उच्चांकी ढोबळ नफा रुपये सात कोटी चव्वेचाळीस लाख रुपये इतका झालेला आहे. यामध्ये अन्य तरतुदी वजा करून *सभासदांना पंधरा टक्के इतका लाभांश* देणार असल्याची घोषणा त्यांनी केली.
शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे म्हणाले, राजे बँकेला कोल्हापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यामध्ये कार्यक्षेत्र विस्तार करून शाखा व व्यवसाय वाढीकरीता मोठी संधी आहे. त्या दृष्टीने भविष्यात बँकेने प्रयत्न करणे आवश्यक आहे. सहकार महर्षी दिवंगत राजे विक्रमसिंह घाटगे यांचे बँकेने शेड्युल बँक हा दर्जा प्राप्त करावा, असे स्वप्न होते, ते पूर्ण करण्यासाठी बँकेने यापुढे प्रयत्न करावेत.
यावेळी सन २०२५-२६ मध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल प्रथम क्रमांक शाखा लक्ष्मीपुरी कोल्हापूर, द्वितीय क्रमांक केनवडे, तृतीय क्रमांक मुख्य शाखा कागल व उत्तेजनात शाखा मुदाळ तिट्टा या शाखांना तर आदर्श कर्मचारी म्हणून संभाजी गाडेकर यांना पुरस्कार देऊन गौरविले. तसेच दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थी व बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यांचा सत्कारही केला. यावेळी सर्व संचालकांसह सभासद,अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वागत संचालक संचालक एम.पी. पाटील यांनी केले. मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण पाटील यांनी नोटीस वाचन केले. उपाध्यक्ष रवींद्र घोरपडे यांनी श्रद्धांजली वाचन केले. संचालक संजय चौगुले यांनी आभार मानले.
चौकट
आज बँकिंग क्षेत्रामध्ये डिजिटल व्यवहाराबरोबर सायबर फसवणुकीचे प्रकारही वाढताना दिसत आहेत. त्यामुळे सर्वांनी डिजिटल बँकिंग करताना विशेष खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे.आपला OTP, ATM PIN, UPI PIN, CVV, पासवर्ड किंवा बँकिंगची गोपनीय माहिती कोणत्याही व्यक्तीला सांगू नये. अनोळखी व्यक्तीचे फोन, संदेश किंवा लिंक यांना प्रतिसाद देऊ नये. बँक कधीही फोन करून अशा गोपनीय माहितीची मागणी करत नाही, हे सर्वांनी लक्षात ठेवावे.सावधानता हीच सायबर फसवणुकीपासूनची पहिली सुरक्षा आहे.आपण स्वतः जागरूक राहूया आणि आपल्या कुटुंबातील इतरांनाही सायबर सुरक्षिततेबाबत जागरूक करूया. असे बँकेच्या अध्यक्षा नवोदिता घाटगे यांनी सांगितले.




