विद्यार्थ्यांना जंतर-मंतरपासून दूर राहण्याचा सल्ला; राहुल गांधींची तीव्र प्रतिक्रिया
मुंबई (प्रतिनिधी) : दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विद्यापीठाने विद्यार्थ्यांसाठी एक सूचना जारी केली आहे. या सूचनेत विद्यार्थ्यांना जंतर-मंतर परिसरापासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला असून, यावरून आता नवा राजकीय वाद निर्माण झाला आहे.

दिल्ली विद्यापीठाने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं आहे की, विद्यार्थ्यांची सुरक्षितता ही सर्वोच्च प्राधान्य आहे. जंतर-मंतर परिसरात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार काही नियम लागू आहेत आणि बेकायदेशीर जमाव किंवा आंदोलनात सहभागी झाल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते. अशा घटनांचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर आणि भविष्यातील करिअरवरही परिणाम होऊ शकतो, त्यामुळे विद्यार्थ्यांनी खबरदारी घ्यावी आणि अफवांपासून दूर राहावं, असं विद्यापीठाने आवाहन केलं आहे.
या सूचनेवर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. त्यांनी सोशल मीडियावर लिहिलं, दिल्ली विद्यापीठाची विद्यार्थ्यांना धमकावण्याची हिंमतच कशी झाली? हे लक्षात ठेवा, योग्य वेळी यासाठी जबाबदारी निश्चित केली जाईल.
दरम्यान, सोनम वांगचुक यांनी सरकारकडून काही आश्वासनं मिळाल्यानंतर आपलं उपोषण मागे घेतलं असलं, तरी आंदोलनातील काही गट आणि संघटना शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम असल्याचं सांगत आहेत.या घडामोडींमुळे जंतर-मंतरवरील आंदोलन आणि त्यासंदर्भातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.




