वैजनाथ मंदिरावर राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेची नजर! सुरक्षेतील मोठ्या त्रुटी उघड, गृह मंत्रालयाच्या महत्त्वाच्या सूचना
बीड (प्रतिनिधी) : बीड जिल्ह्यातील पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैजनाथ मंदिराच्या सुरक्षेची राष्ट्रीय स्तरावर तपासणी करण्यात आली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अधिपत्याखाली काम करणाऱ्या विशेष पथकाने मंदिर परिसराची सखोल पाहणी करत सुरक्षेतील अनेक त्रुटी निदर्शनास आणल्या आहेत.सकाळी 10 वाजता मंदिरात दाखल झालेल्या पथकाने तब्बल साडेचार तास मंदिरातील प्रत्येक प्रवेशद्वार, परिसर आणि विद्यमान सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. देशभरातून मोठ्या संख्येने भाविक येथे येत असल्याने सुरक्षा अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला.

पाहणीनंतर देवस्थान समितीला अनेक महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मंदिरात एक सुरक्षा अधिकारी आणि तीन शस्त्रधारी सुरक्षा रक्षक कायमस्वरूपी तैनात करण्याची शिफारस करण्यात आली आहे. सध्या मंदिरात 18 खासगी सुरक्षा कर्मचारी कार्यरत असले तरी त्यांच्याकडे शस्त्रे नाहीत. तसेच मंदिरातील पोलीस चौकीत दोन अधिकारी असले तरी कोविड काळापासून ते शस्त्रधारी नसल्याचेही समोर आले आहे.
याशिवाय, मंदिरातील सीसीटीव्ही यंत्रणेसाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष उभारणे, सर्व प्रवेशद्वारांवर मेटल डिटेक्टर बसवणे आणि सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या सूचनाही पथकाने दिल्या आहेत.गेल्या काही वर्षांत प्रथमच राष्ट्रीय स्तरावरील सुरक्षा पथकाने वैजनाथ मंदिराची पाहणी केल्याने या घडामोडीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. आता देवस्थान समिती या सर्व सूचनांची अंमलबजावणी किती लवकर करते, याकडे भाविकांसह प्रशासनाचेही लक्ष लागले आहे.
दरम्यान, बीड जिल्ह्यात पावसाची परिस्थिती अद्याप चिंताजनकच आहे. यंदा आतापर्यंत सरासरीच्या केवळ 24 टक्के पावसाची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांत जिल्ह्यात सरासरी 2.9 मिलिमीटर पाऊस झाला असून जूनपासून आतापर्यंत एकूण 135.8 मिलिमीटर पाऊस झाला आहे.
केज तालुक्यात सर्वाधिक 244.6 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे, तर आष्टी तालुक्यात सर्वात कमी पाऊस झाला आहे. पुढील तीन दिवसांसाठी कोणताही हवामान इशारा नसला तरी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.




