वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदी डॉ. अजित लोकरे यांची नियुक्ती

वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदी डॉ. अजित लोकरे यांची नियुक्ती

कोल्हापूर (प्रतिनिधी) - राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सीपीआरचे कान, नाक व घसा तज्ञ डॉ. अजित लोकरे यांची अधिष्ठातापदी नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे हे येत्या ३१ ऑगस्टला सेवानिवृत्त होत आहेत. त्यांची बदली जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात झाली असून, तेथील बालरोग शास्त्र विभागातील पदावरून ते निवृत्त होणार आहेत. 

गेल्या दीड वर्षाहून अधिक काळ अधिष्ठातापदी जबाबदारी डॉ. मोरे यांच्याकडे होती. त्यांच्या बदली व निवृत्तीचे आदेश प्राप्त झाले असून, त्या आदेशानुसार डॉ. लोकरे यांनी अधिष्ठातापदाचा कार्यभार स्वीकारला आहे. डॉ. लोकरे यांनी कान, नाक, घसा विभागप्रमुख म्हणून दीर्घकाळ सेवा बजावली आहे. कोरोना काळात म्युकर मायकोसीस नियंत्रणात आणण्यात त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. याशिवाय मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, कॉखलिएर इम्प्लांटची सुविधा सीपीआरमध्ये सुरू करण्यात आणि कान, नाक,घसा विभागातील वेटिंगलेस शस्त्रक्रिया राबवण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. यापूर्वी दीड वर्षे त्यांनी अधिष्ठाता अधिष्ठाता पदाची जबाबदारीही पार पाडली आहे. 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अखत्यारित सीपीआर रूग्णालयाचा कारभार चालतो. सीपीआरमधील विविध विभागांचे नूतनीकरणाचे काम सुरू असून, येत्या दिवाळीपर्यंत बहुतांश कामे पूर्ण होणार आहेत. दरम्यान, सीपीआर रूग्णालयाच्या वैद्यकीय उपचार सेवेत अधिक सुसूत्रता आणण्याबरोबरच अपघात विभाग तातडीने सुरू करण्याचे आव्हान नव्या अधिष्ठातांसमोर आहे.