शरद इंजिनिअरिंगच्या मेकॅनिकल विभागाला एन.बी.ए.चे पुनर्मानांकन
यड्राव (प्रतिनिधी): यड्राव येथील शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाला राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित नॅशनल बोर्ड ऑफ अॅक्रिडिटेशन (एन.बी.ए.) संस्थेकडून पुढील तीन वर्षांसाठी पुनर्मानांकन प्राप्त झाले आहे. विशेष म्हणजे, एन.बी.ए.च्या बदललेल्या आणि अधिक कठोर झालेल्या ‘टिअर-१’ निकषांनुसार मूल्यांकन पूर्ण करून यशस्वी मानांकन मिळवणाऱ्या देशातील पहिल्या संस्थांपैकी शरद इंजिनिअरिंगचा समावेश झाला आहे. त्यामुळे संस्थेच्या गुणवत्ता-केंद्रित ‘शरद पॅटर्न’ची राष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा प्रभावी नोंद झाली आहे.

अभियांत्रिकी शिक्षणाच्या गुणवत्तेचा राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाचा मापदंड मानल्या जाणाऱ्या एन.बी.ए. मानांकनासाठी संस्थेची सखोल तपासणी करण्यात आली. डॉ. रजत गुप्ता यांच्या नेतृत्वाखालील दोन सदस्यीय समितीने ६ ते ८ मार्च या कालावधीत संस्थेला भेट देऊन अध्यापन पद्धती, शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन कार्य, पायाभूत सुविधा, प्राध्यापकांची शैक्षणिक गुणवत्ता व उपलब्धता, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक यश, उद्योग-संवाद, करिअर मार्गदर्शन, प्लेसमेंट, प्रकल्प कार्य, विद्यार्थी अभिप्राय तसेच आउट कम बेस्ड एज्युकेशन (OBE) प्रणालीची बारकाईने पडताळणी केली.
या मूल्यांकन प्रक्रियेत समितीने विविध प्रयोगशाळा, विभाग, ग्रंथालय, संशोधन सुविधा तसेच शैक्षणिक नोंदींची पाहणी करून संस्थेच्या कार्यपद्धतीचे सर्वंकष मूल्यमापन केले. विद्यार्थीकेंद्रित शिक्षण, उद्योगाभिमुख प्रशिक्षण, संशोधनाला प्रोत्साहन आणि रोजगारक्षमतेवर भर देणाऱ्या शरद इंजिनिअरिंगच्या उपक्रमांना समितीने सकारात्मक प्रतिसाद दिला.
संस्थेचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे म्हणाले, “एन.बी.ए.च्या नवीन आणि अधिक दर्जात्मक निकषांनुसार ‘टिअर-१’ स्तरावर झालेल्या मूल्यांकनात मिळालेले हे यश संपूर्ण शरद परिवारासाठी अभिमानाची बाब आहे. हे पुनर्मानांकन संस्थेच्या सातत्यपूर्ण गुणवत्ता वृद्धीचे, शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या समर्पित प्रयत्नांचे आणि विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट कामगिरीचे फलित आहे. गुणवत्तापूर्ण तांत्रिक शिक्षण देण्याच्या आमच्या वचनबद्धतेवर एन.बी.ए.ने पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले आहे.”
शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण मूल्यांकन प्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. संस्थेचे अध्यक्ष आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी या यशाबद्दल सर्व शिक्षक, अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
हे मानांकन यशस्वीरित्या प्राप्त करण्यासाठी प्रभारी प्राचार्य डॉ. बी. बी. संगमे, एन.बी.ए. समन्वयक डॉ. एस. एस. गुरव, विभागप्रमुख डॉ. एस. डी. पाटील, विभागप्रमुख डॉ. एस. वाय. साळुंखे, सर्व डीन, विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मोलाचे योगदान दिले.
एन.बी.ए.च्या पुनर्मानांकनामुळे शरद इंजिनिअरिंगची राष्ट्रीय स्तरावरील गुणवत्ता अधिक अधोरेखित झाली असून, विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या तांत्रिक शिक्षणासोबतच करिअरच्या अधिक व्यापक संधी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.




