शिवाजी विद्यापीठाला नवे कुलगुरू : डॉ. राजनीश कामत यांची नियुक्ती
कोल्हापूर प्रतिनिधी - शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी प्रा. डॉ. राजनीश कमलाकर कामत यांची नियुक्ती करण्यात आली असून, महाराष्ट्राचे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती जिष्णु देव वर्मा यांनी आज याबाबत घोषणा केली. नियुक्ती आदेशाची प्रत सायंकाळी विद्यापीठ प्रशासनाला प्राप्त झाली.

डॉ. कामत हे शिवाजी विद्यापीठाचे १४ वे कुलगुरू ठरणार आहेत. विशेष म्हणजे, डॉ. दिगंबर शिर्के यांच्यानंतर सलग दुसऱ्यांदा विद्यापीठातीलच प्राध्यापकाकडे कुलगुरूपदाची धुरा सोपविण्यात आली आहे.इलेक्ट्रॉनिक्स अधिविभागाचे माजी प्रमुख असलेल्या डॉ. कामत यांनी विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता म्हणूनही काम पाहिले आहे. सध्या ते मुंबई येथील डॉ. होमी भाभा समूह विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून कार्यरत आहेत. तसेच लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा अतिरिक्त कार्यभारही त्यांच्या खांद्यावर आहे.




