संसदेत एकदा येऊन बघा; राहुल गांधी काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील, संजय राऊतांचा मोदी-शहांवर हल्लाबोल

संसदेत एकदा येऊन बघा; राहुल गांधी काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील, संजय राऊतांचा मोदी-शहांवर हल्लाबोल

मुंबई (प्रतिनिधी) : राजधानी नवी दिल्लीत जंतरमंतरवर विद्यार्थ्यांचे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी दिल्ली पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर हल्लाबोल सुरूच ठेवला आहे. विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण झाल्यापासून मोदी आणि अमित शाह संसदेत आले नसल्याचा आरोप करत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आता जोरदार निशाणा साधला आहे. "आओ ना, डरो मत.. माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात. संसदेत एकदा येऊन तरी बघा. राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील," अशा शब्दांत संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

संजय राऊत म्हणाले की, "आओ ना.. डरो मत.. तुम्ही 56 इंचवाले आहात, माहीत आहे. एकवेळा संसदेत येऊन तरी बघा. डरो मत, राहुल गांधी चांगले संस्कारी आहेत. ते तुम्हाला काहीच होऊ देणार नाहीत, फक्त संसदेत थोडी धुलाई करतील. इतका हक्क नक्कीच आहे. राहुल संसदेच्या दारावर उभे आहेत, चोरून बघू नका. आओ भाई.. आईए," असं म्हणत राऊत यांनी मोदी आणि शाहांवर टीका केली.

दुसरीकडे, संसद परिसरात विरोधी पक्षाच्या खासदारांनी सरकारविरोधात आंदोलन केले. काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी आणि इतर विरोधी खासदारांनी 'अमित शाह जवाब दो' असे लिहिलेले फलक हातात घेतले होते आणि अमित शाह यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. 20 जुलै रोजी विद्यार्थी आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाईबाबत गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत निवेदन द्यावे, अशी विरोधकांची मागणी आहे. जोपर्यंत गृहमंत्री संसदेत निवेदन देत नाहीत, तोपर्यंत हा तिढा कायम राहील, असे प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे.

सभागृहाच्या आतही विरोधी पक्षांचा गदारोळ सुरूच होता. त्यामुळे सकाळी 11 वाजता सुरू झालेले लोकसभेचे कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. या गदारोळामुळे राज्यसभेचे कामकाजही केवळ अर्धा तास चालले. आज लोकसभेत सरकारकडून चार विधेयके सादर केली जाण्याची शक्यता आहे.

समाजवादी पक्षाचे खासदार अखिलेश यादव यांनीही विद्यार्थी आंदोलकांवरील पोलीस कारवाई, राम मंदिरातील प्रसादाची चोरी, महिला आरक्षण, मतदारसंघ पुनर्रचना आणि एफसीआरए विधेयक यांसारख्या मुद्द्यांवरून सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, "आम्ही सरकारला विचारतो की लाठीचार्ज का केला गेला, अश्रुधुराच्या नळकांड्या का फेकल्या गेल्या आणि विजेचे धक्के का दिले गेले. सरकार उत्तर का देत नाही? ते प्रश्नांपासून का पळ काढत आहे?"