सामाजिक एकतेचे दर्शन! सिरत मोहल्ल्यातील भव्य शिबिरात महिलांसह तरुणांकडून रक्तदान

सामाजिक एकतेचे दर्शन! सिरत मोहल्ल्यातील भव्य शिबिरात महिलांसह तरुणांकडून  रक्तदान

कोल्हापूर/प्रतिनिधी : 'रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान' हा संदेश कृतीत आणत, रविवार, ५ जुलै २०२६ रोजी सिरत मोहल्ला येथील हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिराला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. सध्या रक्ताची भासणारी टंचाई लक्षात घेऊन सिरत मोहल्ल्यातील स्थानिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी या समाजोपयोगी उपक्रमाचे आयोजन केले होते. या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे पुरुषांच्या बरोबरीने महिलांनीही अत्यंत उत्साहाने पुढे येत मोठ्या संख्येने रक्तदान केले.

स्थानिक नागरिक, कार्यकर्ते, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सीपीआर रुग्णालय आणि 'पुढारी रिलीफ फाउंडेशन' यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर अत्यंत सुरक्षित वातावरणात पार पडले. सकाळी नऊ वाजल्यापासूनच रक्तदात्यांनी गर्दी केली होती. यंदाच्या शिबिराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे पुरुषांच्या बरोबरीने महिलांनीही मोठ्या संख्येने पुढे येत रक्तदान केले. सर्व रक्तदात्यांची प्राथमिक वैद्यकीय तपासणी करून त्यांना सन्मानपत्रे देण्यात आली.

विविध तरुण मंडळांचा सिंहभागा:

हे शिबिर यशस्वी करण्यासाठी कोल्हापुरातील विविध परिसरातील तरुण मंडळांनी अहोरात्र परिश्रम घेतले. यामध्ये सिरत मोहल्ल्यातील इमदाद सोशल फाउंडेशन, एमएमजी ग्रुप, इंडो ११, डीएम फाउंडेशन, सिरत मोहल्ला फ्रेंड्स सर्कल, सहारा स्पोर्ट्स व ग्रीन स्टार; जवाहरनगरमधील केकेसी ग्रुप, सितारे ग्रुप, गोल्डन बॉईज्, इंडियन बॉईज्, लगान ग्रुप, जेएस स्पोर्ट्स, एएस बॉईज्, जेएम मेंबर व बॉक्सर ग्रुप; राजेंद्रनगरमधील ब्लड बॉईज् स्पोर्ट्स, चाँद तारा बॉईज्, शाहू स्पोर्ट्स व स्वराज्य तालीम; पाचगावच्या सुलतान फायटर ग्रुपसह भारतनगर व आर. के. नगरमधील तरुणांनी सक्रिय सहभाग नोंदवला.

"रक्तदान हेच जीवनदान असून, सर्व तरुण मंडळे आणि महिलांच्या एकजुटीमुळेच आम्ही सीपीआर हॉस्पिटलसाठी मोठ्या प्रमाणात रक्त संकलित करू शकलो," असे सांगत मुख्य आयोजकांनी सर्व रक्तदात्यांचे आणि वैद्यकीय पथकाचे आभार मानले. या यशस्वी उपक्रमाबद्दल सिरत मोहल्ला परिसरातील तरुणांचे कोल्हापुरातून कौतुक होत आहे.