सिंधुदुर्गातून 'गोकुळ'चे एक लाख लिटर दूध संकलनाचे लक्ष्य; जिल्हा बँकेच्या सहकार्याने कृती आराखडा
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) आणि सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दूध संकलनात मोठी वाढ करण्यासाठी व्यापक कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. सध्या दररोज २० ते २५ हजार लिटर दूध संकलित होत असताना, ते टप्प्याटप्प्याने वाढवत प्रतिदिन एक लाख लिटरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

यासंदर्भातील प्राथमिक नियोजन बैठक ओरस येथे पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी गोकुळच्या प्रशासक मंडळाचे अध्यक्ष तथा सिंधुदुर्गचे जिल्हा उपनिबंधक प्रदीप मालगावे होते. बैठकीत नवीन दूध संस्थांची स्थापना, विद्यमान संस्थांचे सक्षमीकरण, सेवा सहकारी संस्थांमार्फत दूध संकलन वाढविणे, दूध उत्पादकांना आधुनिक दुग्ध व्यवसायाचे प्रशिक्षण देणे, पशुवैद्यकीय सेवा अधिक प्रभावी करणे आणि वैरण विकास यावर सविस्तर चर्चा झाली.
यासोबतच शासनाच्या विविध योजनांचा लाभ दूध उत्पादकांपर्यंत पोहोचविणे तसेच दुभती जनावरे खरेदीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत सुलभ कर्जपुरवठा उपलब्ध करून देण्याबाबतही सकारात्मक निर्णय घेण्यात आला.
प्रदीप मालगावे यांनी सांगितले की, गोकुळने नेहमीच दूध उत्पादकांच्या हिताला प्राधान्य दिले असून स्पर्धात्मक दूध दर, तांत्रिक मार्गदर्शन आणि विविध योजनांच्या माध्यमातून दुग्ध व्यवसाय अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात दूध उत्पादन वाढीस मोठी क्षमता असून, नियोजनबद्ध प्रयत्नांतून प्रतिदिन एक लाख लिटर दूध संकलनाचे उद्दिष्ट गाठले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी, दूध उत्पादकांना जातिवंत गायी-म्हशी खरेदीसाठी आवश्यक आर्थिक पाठबळ आणि कर्जसुविधा देण्यासाठी जिल्हा बँक पूर्ण सहकार्य करेल, अशी ग्वाही दिली.
बैठकीत दूध उत्पादकांनी सिंधुदुर्गमध्ये गोकुळच्या वतीने जातिवंत म्हशींचे खरेदी-विक्री केंद्र सुरू करणे, पशुवैद्यकीय सेवा अधिक गतिमान करणे तसेच नियमित प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्याची मागणी केली. या सर्व सूचनांचा सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन देण्यात आले.
गोकुळ, सिंधुदुर्ग जिल्हा बँक, कृषी व पशुसंवर्धन विभाग तसेच स्थानिक संस्थांच्या समन्वयातून दूध वाढ कृती कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. या उपक्रमामुळे सिंधुदुर्गमधील दुग्ध व्यवसायाला चालना मिळून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यासोबतच गोकुळच्या दूध संकलनातही लक्षणीय वाढ होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, गोकुळचे अधिकारी डॉ. दयावर्धन कामत, धनाजी पाटील, भरत मोळे, सर्जेराव मानकर, डॉ.प्रकाश दळवी, डॉ.नितीन रेडकर, विलास पाटील, शंकर जोंदळेकर, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अधिकारी तसेच दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते.




