'हे कसले जेन-Z? यात भाजप आणि संघ परिवारातीलच मुलं-नातवंडं'; मोहन भागवतांच्या कार्यक्रमावरून संजय राऊतांचा हल्लाबोल

'हे कसले जेन-Z? यात भाजप आणि संघ परिवारातीलच मुलं-नातवंडं'; मोहन भागवतांच्या कार्यक्रमावरून संजय राऊतांचा हल्लाबोल

मुंबई (प्रतिनिधी) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आज (6 ऑगस्ट) मुंबईत तरुण पिढीशी थेट संवाद साधणार आहेत. वांद्रे-कुर्ला संकुलातील निता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्रात 'जनरेशन Z' आणि 'जनरेशन अल्फा'च्या विद्यार्थ्यांसाठी विशेष संवाद सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमावरून शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी खोचक टीका करत जोरदार हल्लाबोल केला आहे.

संजय राऊत म्हणाले, हे कसले जेन-Z? यात नेमकं कोण आहेत? यात सगळी भाजप आणि संघ परिवारातील मुलं आणि नातवंडंच आहेत. आपल्या पदाधिकाऱ्यांच्या मुलांशी आणि नातवंडांशी बोलून काय उपयोग? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

राऊत पुढे म्हणाले, माझ्या मते दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलनासाठी आलेले तरुण आणि विद्यार्थी हेच खरे जेन-Z आहेत. त्यांनी सरकारविरोधात आवाज उठवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागितल्यानंतरही अमित शाह यांच्या अखत्यारीतील यंत्रणा त्यांच्या घरी जाऊन पालकांना दमदाटी करत असल्याचे आणि गुन्हे दाखल करत असल्याचे आरोप होत आहेत. प्रिया नावाच्या एका विद्यार्थिनीने नुकतीच राहुल गांधी यांची भेट घेतली. अशा तरुणांशी मोहन भागवत यांनी संवाद साधला पाहिजे.

याचवेळी त्यांनी पुन्हा एकदा खोचक टीका करत, स्वतःच्या पदाधिकाऱ्यांच्या मुलांशी आणि नातवंडांशी संवाद साधून काहीही साध्य होणार नाही, असे म्हटले.

दरम्यान, शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हासंदर्भातील न्यायालयीन सुनावणीवरही संजय राऊत यांनी भाष्य केले. ते म्हणाले, आम्ही निर्धास्त आहोत. ज्यांनी बेईमानी केली आणि घटनेशी द्रोह केला, त्यांना कायद्याच्याच मार्गाने उत्तर देऊ. समोरच्या गटात चलबिचल सुरू असून भाजपमध्ये विलीन होण्याबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. जर न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळला आणि आमच्या बाजूने निकाल दिला, तर तो लोकशाहीचा आणि महाराष्ट्रातील जनतेचा मोठा विजय असेल.

राऊत यांनी पुढे सांगितले की, 2014 आणि 2019 च्या निवडणुका उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीच लढवल्या गेल्या होत्या आणि आजच्या फुटीर गटातील नेतेही त्याच नेतृत्वाखाली निवडणुका लढले होते. त्यामुळे वैचारिक मतभेदाचा दावा योग्य ठरत नाही. न्यायालयाने कपिल सिब्बल यांचे म्हणणेही ऐकून घेतले असून, आजच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे, असेही त्यांनी नमूद केले.