४२ केंद्रांवर महा TET परीक्षा २०२५ सुरळीत पार

४२ केंद्रांवर महा TET परीक्षा २०२५ सुरळीत पार

कोल्हापूर (प्रतिनिधी) - महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने २३ नोव्हेंबर २०२५ रोजी महा TET परीक्षा - २०२५ सुरळीत पार पडली. कोल्हापूर जिल्ह्यात या परीक्षेसाठी एकूण ४२ परीक्षा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती. पहिल्या पेपरसाठी ७६४६ पैकी ७१९२ परीक्षार्थी उपस्थित राहिले, तर ४५४ परीक्षार्थी गैरहजर होते. दुसऱ्या पेपरमध्ये १२१९३ पैकी ११५४५ परीक्षार्थी उपस्थित राहिले तर ६४८ परीक्षार्थी अनुपस्थित होते.

परीक्षेदरम्यान सर्व केंद्रांवर बायोमेट्रिक हजेरी घेण्यात आली आणि प्रत्यक्ष तसेच बायोमेट्रिक उपस्थिती यांमध्ये तंतोतंत साम्य आढळले. यासाठी परीक्षा परिषदेकडून स्वतंत्र एजन्सीची नेमणूक करण्यात आली होती. प्रत्येक केंद्राच्या प्रत्येक खोलीत CCTV निरीक्षण व्यवस्था होती, तसेच झोनल अधिकार्‍यांसोबत स्वतंत्र व्हिडिओ चित्रीकरण पथकही नियुक्त करण्यात आले होते. जिल्हा पोलीस दलामार्फत कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला.

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण परीक्षा प्रक्रिया सुरळीत पार पडली. मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., विविध विभागांचे विभागप्रमुख, प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी तसेच डायट कोल्हापूरचे प्रभारी प्राचार्य यांनी विविध परीक्षा केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली.

परीक्षा दिवशी मुरगूड पोलीस ठाण्यात दोन संशयितांविरोधात FIR दाखल करण्यात आला. काही परीक्षार्थींना पेपर आधी मिळणार असल्याचे भासवून त्यांनी फसवणूक केल्याची नोंद झाली. मात्र या प्रकरणाचा कोल्हापूर जिल्ह्यातील TET - २०२५ परीक्षेशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. जिल्हा कस्टडीमध्ये २४ तास CCTV, पोलिस बंदोबस्त आणि SOP नुसार सर्व सुरक्षा उपाय काटेकोरपणे पाळले गेले होते. संशयितांकडून कोणतीही प्रश्नपत्रिका जप्त झाली नाही; त्यामुळे परीक्षार्थीची फसवणूक झाल्याचे दिसून आले. पोलीस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले की, परीक्षा परिषदेकडून दिलेल्या SOP नुसार संपूर्ण प्रक्रिया पार पाडण्यात आली. सर्व गोपनीय साहित्य योग्यवेळी, CCTV आणि पोलिस बंदोबस्तात परीक्षाकेंद्रांवर पोहोचविण्यात आले. त्यामुळे महा TET परीक्षा २०२५ कोल्हापूर जिल्ह्यात अत्यंत पारदर्शकपणे पार पडली.