370 रुपयांच्या बिर्याणी' वादात मुनव्वर फारुकीची एन्ट्री; प्रणित मोरेच्या समर्थनार्थ म्हणाला, "आता बस करा

370 रुपयांच्या बिर्याणी' वादात मुनव्वर फारुकीची एन्ट्री; प्रणित मोरेच्या समर्थनार्थ म्हणाला, "आता बस करा

मुंबई (प्रतिनिधी) : '370 रुपयांच्या बिर्याणी' प्रकरणामुळे स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरे आणि हिमांशू जांगडा मोठ्या वादात सापडले आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दोघांवरही टीकेची झोड उठली. या प्रकरणात एफआयआर दाखल झाली असून संबंधितांना व्यावसायिक आणि वैयक्तिक पातळीवरही मोठा फटका बसल्याची चर्चा आहे.

दरम्यान, प्रसिद्ध कॉमेडियन मुनव्वर फारुकीने प्रणित मोरेच्या समर्थनार्थ भूमिका घेतली आहे. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये त्याने हा वाद आता थांबवण्याचे आवाहन केले.मुनव्वर म्हणाला, "या प्रकरणात अनेक चुकीच्या गोष्टी बोलल्या गेल्या. त्या वक्तव्यांशी मी सहमत नाही. मात्र, त्यासाठी संबंधितांना मोठी किंमत मोजावी लागली आहे. एफआयआर झाली, नोकरी गेली, करिअरवर परिणाम झाला आणि समाजातही बदनामी झाली."

पुढे तो म्हणाला, "त्यांनी केलेल्या वक्तव्याची शिक्षा त्यांना मिळाली आहे. पण आता कंटेंटच्या नावाखाली त्यांना सतत लक्ष्य करणं योग्य नाही. प्रत्येक गोष्टीची एक मर्यादा असते."ट्रोलिंगबाबत चिंता व्यक्त करताना मुनव्वरने इशारा दिला की, "एखाद्या व्यक्तीवर सातत्याने होणारा दबाव किती घातक ठरू शकतो, याचा विचार केला पाहिजे. कायद्यानुसार जी कारवाई होणार आहे ती होईलच, पण सोशल मीडियावरील द्वेषाची मोहीम आता थांबली पाहिजे."

उल्लेखनीय म्हणजे, प्रणित मोरेच्या शोमधील एका व्हिडिओमध्ये हिमांशू जांगडाने डेटिंगचा अनुभव सांगताना केलेल्या वक्तव्यामुळे हा संपूर्ण वाद निर्माण झाला. सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर हिमांशू आणि प्रणित या दोघांनीही स्वतंत्र व्हिडिओद्वारे जाहीर माफी मागितली आहे.